झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बांगर मुख्य प्रशिक्षक
By admin | Published: May 27, 2016 04:00 AM2016-05-27T04:00:15+5:302016-05-27T04:00:15+5:30
टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
नवी दिल्ली : टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
बीसीसीआयचे नवनियुक्त सचिव अजय शिर्के यांनी गुरुवारी याबाबत स्पष्ट करताना सांगितले की, ८ जूनपासून झिम्बाब्वेच्या यजमानपदाखाली प्रारंभ होत असलेल्या दौऱ्यासाठी बांगर यांच्याकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आंध्र क्रिकेट संघटनेचे विभागीय सचिव कोका रमेश संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक असतील. अभय शर्मा क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
भारतीय संघ या दौऱ्यात तीन वन-डे व तीन टी-२० सामने खेळणार आहे. पहिला वन-डे ११ जून, दुसरा वन-डे १३ जून आणि तिसरा वन-डे १५ जून रोजी खेळला जाणार आहे, तर पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना १८ जून रोजी, दुसरा २० जून रोजी, तर अखेरचा सामना २२ जून रोजी खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)