बांगला शेर झाले ढेर...

By admin | Published: May 31, 2017 12:52 AM2017-05-31T00:52:39+5:302017-05-31T00:52:49+5:30

भुवनेश्वर कुमार (३/१३) आणि उमेश यादव (३/१६) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा

Bangla Sher looted ... | बांगला शेर झाले ढेर...

बांगला शेर झाले ढेर...

Next

लंडन : भुवनेश्वर कुमार (३/१३) आणि उमेश यादव (३/१६) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा २४० धावांनी फडशा पाडला. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३२४ धावांचा
डोंगर उभारल्यानंतर, बांगलादेशचा अवघ्या ८४ धावांत खुर्दा उडवून दणदणीत विजय मिळवला. याआधीच्या सराव सामन्यातही न्यूझीलंडचा सहजपणे पराभव केल्याने प्रतिस्पर्धी संघांना भारताने धोक्याचा इशारा दिला आहे.
केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताच्या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशचे वाघ सुरुवातीपासूनच धडपडले. केवळ मुस्तफिजूर रहीम (१३), मेहदी हसन मिराज (२४) आणि सुनझमुल इस्लाम (१८) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आले. इतर सर्व फलंदाज केवळ हजेरी लावून परतले. बांगलादेशच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांनी वेगवान गोलंदाजीला पोषक वातावरणाचा फायदा घेत बांगलादेशच्या फलंदाजीला खिंडार पाडले. भुवीने १३ धावांत ३, तर उमेशने १६ धावांत ३ बळी घेतले. तसेच, महंमद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन आश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या व शिखर धवन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३२४ धावांचा डोंगर उभारला. कार्तिकने निवृत्त होण्यापूर्वी ७७ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ९४ धावांची खेळी केली. त्याने धवनसोबत (६०) तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. पांड्याने अखेरच्या काही षटकांत
हल्ला चढवताना ५४ चेंडूंमध्ये
सहा चौकार व चार षटकारांसह नाबाद ८० धावा काढत भारताला ३०० चा पल्ला ओलांडून दिला. त्याने रवींद्र जडेजासह (३२) सहाव्या विकेटसाठी १२.५ षटकांत ८६ धावांची भागीदारी केली.
बांगलादेशतर्फे वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनने ५० धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर डावखुरा फिरकीपटू सुंजामुल इस्लामने ७४ धावांत दोन फलंदाजांना माघारी पाठवले. दरम्यान दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माचे अपयश भारतासाठी चिंतेची बाब ठरली. (वृत्तसंस्था)


धावफलक

भारत : रोहित शर्मा त्रि. गो. रुबेल हुसेन ०१, शिखर धवन झे. मेहदी हसन गो. सुंजामुल ६०, अजिंक्य रहाणे त्रि. गो. मुस्तफिजूर ११, दिनेश कार्तिक रिटायर्ड हर्ट ९४, केदार जाधव त्रि. गो. सुंजामुल ३१, हार्दिक पांड्या नाबाद ८०, रवींद्र जडेजा झे. शाकिब गो. रुबेल ३२, रविचंद्रन आश्विन त्रि. गो. रुबेल ०५, भुवनेश्वर कुमार नाबाद ०१. अवांतर (९). एकूण : ५० षटकांत ७ बाद ३२४. गोलंदाजी : मुस्तफिजूर ८-०-५३-१, रुबेल हुसेन ९-०-५०-३, सुंजामुल ९-०-७४-२.

बांगलादेश : इम्रूल कायस झे. यादव गो. भुवनेश्वर ७, सौम्या सरकार झे. कार्तिक गो. उमेश २; शब्बीर रहमान त्रि. गो. उमेश ०; मुस्तफिकूर रहीम झे. जडेजा गो. शमी १३, शाकिब-अल-हसन झे. रोहित गो. भुवनेश्वर ७; महमुदुल्लाह झे. कार्तिक गो. भुवनेश्वर ०; मोसद्देक झे. कार्तिक गो. उमेश ०; मिराज झे. कार्तिक गो. बुमराह २४, सुंजामुल झे. रोहित गो. आश्विन १८, तास्किन नाबाद १, रुबेल झे. रहाणे गो. पांड्या ०. अवांतर - १२. एकूण : २३.५ षटकांत सर्व बाद ८४ धावा.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-०-१३-३; उमेश यादव ५-१-१६-३; महंमद शमी ६-०-१७-१; जसप्रीत बुमराह ५-०-३२-१; हार्दिक पांड्या १.५-०-२-१; रविचंद्रन आश्विन १-०-२-१.

Web Title: Bangla Sher looted ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.