बांगलादेशची श्रीलंकेवर २३ धावांनी मात
By admin | Published: February 28, 2016 11:48 PM2016-02-28T23:48:59+5:302016-02-28T23:48:59+5:30
गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या बळावर बांगलादेशने आशिया कप टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत आज येथे श्रीलंकेवर २३ धावांनी विजय मिळवताना आपल्या आशा जिवंत ठेवल्या
मीरपूर : शब्बीर रहमान याची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या बळावर बांगलादेशने आशिया कप टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत आज येथे श्रीलंकेवर २३ धावांनी विजय मिळवताना आपल्या आशा जिवंत ठेवल्या.
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या १४८ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला ८ बाद १२४ पर्यंतच मजल मारता आली. त्याचबरोबर श्रीलंकेला स्पर्धेत पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली. बांगलादेशचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय आहे. श्रीलंकेकडून दिनेश चांदीमल याने सर्वाधिक ३७ धावा केल्या. बांगलादेशकडून अल अमीन हुसैन याने ३४ धावांत ३ गडी बाद केले. शाकीबने २१ धावांत २ बळी घेतले. मुस्तफिजूर रहमान याने हाणामारीच्या षटकात शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत फक्त १९ धावा देताना १ गडी बाद केला.
त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने २0 षटकांत ७ बाद १४७ धावा केल्या. बांगलादेशकडून शब्बीर रहमान याने सर्वाधिक ५४ चेंडूंत १0 चौकार आणि ३ षटकारांसह ८0 धावा केल्या. तसेच, त्याने शाकीबसोबत चौथ्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी करताना बांगलादेशला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरताना आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. शकीब अल हसन याने ३४ चेंडूंत ३ चौकारांसह ३२ धावांची खेळी केली. दोन्ही जम बसलेले फलंदाज परतल्यानंतर महमुदुल्लाहने १२ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह नाबाद २३ धावांची वेगवान खेळी केली. श्रीलंकेकडून दुशमंता चमीराने ३0 धावांत ३ गडी बाद केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर मोहंमद मिथुन आणि सौम्या सरकार पहिल्या दोन षटकांतच तंबूत परतले. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. मुशफिकर रहीमदेखील ४ धावा काढून धावबाद झाला. त्यामुळे त्यांची धावसंख्या ३ बाद २६ अशी झाली. तथापि, शब्बीरने दुसऱ्या एंडकडून धावा काढण्याचा सपाटा सुरू ठेवला. बांगलादेशच्या डावाच्या पहिल्या १६ षटकांत शब्बीरच्या रूपाने ‘वन मॅन शो’ पाहायला मिळाला. बांगलादेशच्या पहिल्या तीन षटकांत ६ धावाच झाल्या होत्या; परंतु डावाच्या चौथ्या षटकात शब्बीरने नुवान कुलसेखरच्या पहिल्या चार चेंडूंत ३ चौकार आणि एक षटकार ठोकताना प्रेक्षकांना रोमांचित केले. त्यानंतर पहिला बदलाच्या रूपात आलेल्या परेराचेही त्याने तीन चौकार मारून स्वागत केले. दुसरीकडे शाकिबला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला; परंतु शब्बीरने शेहान जयसूर्याला षटकार ठोकताना टी-२0 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने या गोलंदाजाच्या पुढील दोन चेंडूंवर चौकारही ठोकले. चमीराच्या गोलंदाजीवर षटकार ठोकल्यानंतर
तो डीप मिडविकेटला झेल देऊन
बाद झाला. चमीराने पुढच्या
षटकात शाकिबला यष्टिपाठीमागे झेलबाद केले.(वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
बांगलादेश : २0 षटकांत ७ बाद १४७. (शब्बीर रहमान ८0, शकीब अल हसन ३२, महमुदुल्लाह नाबाद २३. डी. चमिरा ३/३0, अँजलो मॅथ्यूज १/८, नुवान कुलसेखरा १/४४).
श्रीलंका : २0 षटकांत ८ बाद १२४.
(दिनेश चांदीमल ३७, जेहान जयसूर्या २६. अल अमीन हुसैन ३/३४, मुस्तफिजूर रहमान १/१९, शकीब अल हसन २/२१, मोर्तझा १/१७).