बांगलादेश दौऱ्यासाठी संचालकपदी शास्त्री कायम
By admin | Published: May 20, 2015 01:27 AM2015-05-20T01:27:38+5:302015-05-20T01:27:38+5:30
भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री पुढील महिन्यात होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या संचालकपदी कायम राहणार आहेत.
नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री पुढील महिन्यात होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या संचालकपदी कायम राहणार आहेत.
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले, की शास्त्री यांना बांगलादेश दौऱ्यानंतरही पदावर कायम राखण्याची बोर्डाची इच्छा आहे, पण शास्त्री भविष्यात समालोचन करण्यास इच्छुक आहेत. शास्त्री सध्या संघाच्या संचालकपदी कायम राहतील. त्यांना या पदावर कायम राखण्यास बीसीसीआय उत्सुक आहे, पण बांगलादेश दौऱ्यानंतर काय होते, हे सांगता येत नाही. कारण, शास्त्री प्रदीर्घ कालावधीसाठी ही भूमिका बजावण्यास उत्सुक नाहीत.
माजी अष्टपैलू रवी शास्त्री यांची विश्वकप स्पर्धेनंतर पद सोडण्याची इच्छा होती, पण बीसीसीआयच्या नव्या कार्यकारिणीच्या निवेदनानंतर शास्त्री यांनी बांगलादेश दौऱ्यापर्यंत पदावर कायम राहण्यास मंजुरी दिली आहे. या दौऱ्यानंतर शास्त्री यांनी पद सोडल्यास माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर विचार होऊ शकतो. त्याआधी, बीसीसीआय बांगलादेश दौऱ्यापूर्वी डंकन फ्लेचरचे रिक्त स्थान भरण्यास प्रयत्नशील आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड या पदासाठी आॅस्ट्रेलियन खेळाडूला प्राधान्य देण्याची शक्यता आहे.(वृत्तसंस्था)