बलाढ्य भारताचे आव्हान पेलण्यास बांगलादेश सज्ज : मूर्तझा
By admin | Published: May 22, 2015 12:48 AM2015-05-22T00:48:56+5:302015-05-22T00:48:56+5:30
टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारताच्या बलाढ्य संघाचे आव्हान पेलण्यास बांगलादेश सज्ज असल्याचे मत या संघाचा कर्णधार मुशर्रफ मूर्तझा याने व्यक्त केले आहे.
ढाका : पुढील महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारताच्या बलाढ्य संघाचे आव्हान पेलण्यास बांगलादेश सज्ज असल्याचे मत या संघाचा कर्णधार मुशर्रफ मूर्तझा याने व्यक्त केले आहे.
बीसीसीआयने बुधवारी विराट कोहलीच्या नेतृत्वात कसोटी तसेच महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात वन डे संघाची घोषणा केली. या दौऱ्यात संपूर्ण ताकदीनिशी संघ पाठविण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयामुळे सिनियर्सच्या विश्रांती घेण्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. मूर्तझा म्हणाला, ‘भारताने भक्कम संघासह बांगलादेश दौरा करावा, अशी आम्हालादेखील अपेक्षा होती. सर्वच खेळाडू अव्वल दर्जाचे असल्याने भारतीय संघ आमच्यासाठी मोठे आव्हानच असेल. हे कडवे आव्हान पेलण्यास आम्ही सज्ज आहोत.’
भारताने मार्च महिन्यात विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव केला होता. मूर्तझा म्हणाला, ‘मोहम्मद शमीचा अपवाद वगळता दौऱ्यावर येणारा भारताचा संघ विश्वचषकासारखाच आहे. भारतीय फलंदाजी क्रम नंबर वन असल्याने आमच्या गोलंदाजांना मोठे आव्हान असेल.’ वेनवान गोलंदाज धवल कुलकर्णी याला शमीऐवजी संघात स्थान मिळाले. भारताने गतवर्षी देखील आयपीएल आटोपताच बांगलादेशचा दौरा केला होता. तीन वन डे सामन्यासाठी धोनी आणि कोहलीसह काही सिनियर्स खेळाडूंनी विश्रांती घेतली होती. सुरेश रैना संघाचा कर्णधार होता. भारताने ही मालिका २-० ने जिंकली; पण मूर्तझाने त्या वेळी दुय्यम संघ पाठविण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर बरेच तोंडसुख घेतले होते.
मूर्तझा म्हणाला, ‘बलाढ्य संघ दौऱ्यावर येत असेल तर अवांतर दडपण येते. यंदा मात्र आमच्यावर दडपण नाहीच. या संघाविरुद्ध चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल.
भारताच्या याच संघाने विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळला होता, हे विसरून चालणार नाही.’ ७ जूनपासून सुरू होत असलेल्या या दौऱ्यात भारत एकमेव कसोटी सामना आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळेल. कसोटी १० जूनपासून सुरू होईल. वन डे सामन्यांचे आयोजन
मीरपूर येथे १८, २१ आणि २४ जून रोजी होईल. (वृत्तसंस्था)