बांगलादेशला १८२ धावांत गुंडाळले
By admin | Published: June 6, 2017 04:59 AM2017-06-06T04:59:03+5:302017-06-06T05:01:02+5:30
आॅस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत सोमवारी बांगलादेशच्या फलंदाजांना जखडून ठेवताना त्यांना ४४.३ षटकांत १८२ धावांत गुंडाळले.
लंडन : सलग दुसऱ्या शतकापासून वंचित राहिलेल्या तमीम इकबालच्या झुंजार खेळीनंतरही मिशेल स्टार्कच्या भेदक माऱ्याच्या बळावर आॅस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत सोमवारी बांगलादेशच्या फलंदाजांना जखडून ठेवताना त्यांना ४४.३ षटकांत १८२ धावांत गुंडाळले.
बांगलादेशकडून तमीम इकबाल याने सर्वाधिक ११४ चेंडूंत ६ चौकार, ३ षट्कारांसह ९५ व शाकीब अल हसनने ४८ चेंडूंत २ चौकारांसह २९ धावा केल्या. या दोघांशिवाय मेहदी हसन मिराज (१४) हाच दुहेरी आकडी धावा फटकावू शकला. आॅस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने २९ धावांत ४ गडी बाद केले. अॅडम झम्पाने २ बळी घेतले. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; परंतु हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. त्यांची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी १६.२ षटकांतच सलामीवीर सौम्या सरकार (३), इमरुल केज (६) आणि मुशफिकर रहीम (९) हे धावफलकावर अवघ्या ५३ धावा असतानाच गमावले. हेजलवूडने सौम्या सरकार याला यष्टिरक्षक वाडेकरवी ३ धावांवर झेलबाद केले, तर इमरुल केजला कमिन्सने व मुशफिकर रहीमला हेनरिक्सने तंबूत धाडले. तथापि, एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या तमीम इकबालला अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याने चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी १३.३ षटकांत ६९ धावांची भागीदारी करताना बांगलादेशची पडझड थोपवली; परंतु फिरकी गोलंदाज टीम हेडने शकीब अल हसन याला पायचीत करताना आॅस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर फलंदाजीस आलेले शब्बीर रहमान (८), महमुदुल्लाह (८) तमीमला साथ देऊ शकले नाहीत. त्यातच मिशेल स्टार्कने त्याच्या वैयक्तिक आठव्या आणि डावाच्या ४३ व्या षटकांत शतकाकडे वाटचाल करणाऱ्या तमीमला पहिल्या, मुशरफे मोर्तजाला तिसऱ्या आणि रुबेल हुसेनला चौथ्या चेंडूंवर बाद करीत बांगलादेशच्या आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याच्या उरल्यासुरल्या आशेला सुरुंग लावला. त्यानंतर पुढच्या षटकांत स्टार्कने मेहदी हसनला बाद करीत बांगलादेशच्या डावाला पूर्णविराम दिला. (वृत्तसंस्था)
>पावसाचा व्यत्यय
पावसामुळे खेळ थांबला तेव्हा आॅस्ट्रेलियाने १६ षटकांत १ बाद ८३ धावा केल्या होत्या. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पाऊ स थांबला नव्हता. त्यामुळे सामन्याचे भवितव्य अधांतरी होते.