बांगलादेश १०५ धावांनी विजयी
By admin | Published: February 19, 2015 02:26 AM2015-02-19T02:26:07+5:302015-02-19T02:26:07+5:30
शाकीब अल् हसन आणि मुशफिकर रहीम यांच्या अर्धशतकांच्या बळावर बांगलादेशाने विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या अफगाणिस्तानला बुधवारी १०५ धावांनी पराभूत केले.
अफगाणिस्तानला अनुभव पडला कमी : शाकीब, मुशफिकर यांची अर्धशतकी खेळी
कॅनबेरा : शाकीब अल् हसन आणि मुशफिकर रहीम यांच्या अर्धशतकांच्या बळावर बांगलादेशाने विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या अफगाणिस्तानला बुधवारी १०५ धावांनी पराभूत केले.
नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाने २६७ धावा ठोकल्या. एक वेळ त्यांचीही ४ बाद ११९ अशी दयनीय अवस्था होती; पण शाकीब ६३ आणि मुशफिकर ७१ यांनी पाचव्या गड्यासाठी ११४ धावा ठोकून संघाला तारले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ ४२.५ षटकांत १६२ धावांत बाद झाला. समीउल्लाह शेनवारी ४२ व कर्णधार मोहंमद नबी ४४ हेच बांगलादेशाच्या माऱ्याला समर्थपणे तोंड देऊ शकले. बांगलादेशासाठी मुशर्रफ मुर्तझाने तीन आणि शाकीबने दोन गडी बाद केले.
बांगलादेशाच्या आणखी धावा झाल्या असत्या; पण शाकीब आणि रहीम बाद होताच अखेरचे ५ गडी केवळ ३४ धावांची भर घालून बाद झाले. त्याआधी मीरवैझ अश्रफने बांगलादेशाला बॅकफुटवर आणले. त्याने इनामुल हक् २९ आणि तमीम इक्बाल १९ यांना झटपट बाद केले. सौम्या सरकार २८, महमदुल्लाह २३ यांना शापूर जरदान याने बाद केले. नंतर शाकीबने २७वे अर्धशतक नोंदविले; शिवाय ४ हजार धावा करणारा बांगलादेशाचा पहिला खेळाडू बनला. रहीमने ५६ चेंडूंवर ६ चौैकार व एका षटकारासह १९ वे वन डे अर्धशतक गाठले. अफगाणिस्तानला पुरेसा अनुभव नसल्याने ३ धावांत त्यांचे ३ गडी तंबूत परतले. नवरोज मंगल २७ आणि शेनवारी ४२ यांनी मोठी भागीदारी केली. बांगलादेशाला २१ फेब्रुवारी रोजी आॅस्ट्रेलियाविरुद्ध तसेच अफगाणिस्तानला २२ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे.
(वृत्तसंस्था)
बांगलादेश : अनामूल हक त्रि. गो. अशरफ २९, तमीम इक्बाल झे. जजाइ गो. अशरफ १९, सौम्या सरकार पायचित गो. जरदान २८, महमुदुल्लाह झे. जजाइ गो. जरदान २३, शाकिब अल हसन त्रि. गो. हसन ६३, मुशफिकर रहीम झे. शेनवारी गो. नबी ७१, साबिर रहमान त्रि. गो. हसन ३, मुशर्रफ मोर्ताझा त्रि. गो. आलम १४, मोमिनूल हक धावबाद ३, रुबेल हुसेन नाबाद ००, तस्किन अहमद त्रि. गो. आलम १, अवांतर : १३, एकूण : ५० षटकांत सर्वबाद २६७ धावा. गडी बाद क्रम : १/४७, २/५२, ३/१०२, ४/११९, ५/२३३, ६/२४१, ७/२४७, ८/२६३, ९/२६३, १०/२६७. गोलंदाजी : हसन १०-०-६१-२, जरदान ७-१-२०-२, आलम ९-०-५५-२, अशरफ ९-३-३२-२, नबी ९-०-५८-१, अहमदी ४.५-०-३२-०, शेनवारी १.१-०-२-०.
अफगाणिस्तान : जावेद अहमदी झे. आणि गो. मूर्तझा १, अफसन जजाइ पायचित गो. हुसेन १, नवरोज मंगल झे. हुसेन गो. महमुदुल्लाह २७, असगर स्टानिजइ झे. महमुदुल्लाह गो. मूर्तझा १, सामिउल्लाह शेनवारी धावबाद ४२, मोहम्मद नबी झे. सरकार गो. मूर्तझा ४४, नजिबुल्लाह जरदान पायचित गो. शाकिब १७, मीरवाईज अशरफ झे. मूर्तझा गो. शाकिब १०, आफताब आलम धावबाद १४, हामिस हसन झे. हक गो. अहमद ००, शापूर जरदान नाबाद २, अवांतर : ३, एकूण : ४२.५ षटकांत सर्वबाद १६२ धावा. गडी बाद क्रम:१/२, २/२, ३/३, ४/६५. ५/७८, ६/१३६, ७/१३६, ८/१५४, ९/१५४, १०/१६२. गोलंदाजी : मूर्तझा ९-२-२०-३, हुसेन ६-०-२७-१, अहमद ७-०-२३-१, हसन ८.५-०-४३-२, महमुदुल्लाह ८-१-३१-१, सरकार ३-०-१३-०, रहमान १-०-४-०.
४०४० शाकिब उल हसनने ओडीआयमध्ये केलेल्या धावा. ४ हजार धावा पुर्ण करणारा शाकिब हा पहिला बांगलादेशचा खेळाडू.
११४शाकिब व रहीम यांनी पाचव्या विकेटसाठी केलेली सर्वात मोठी भागिदारी.
२६७बांगलादेश संघाने आॅस्ट्रेलियामध्ये आत्ता पर्यंत केलेली ओडीआयमधील सर्वाधिक धावसंख्या.
१०५बांगलादेश संघाचा विश्वचषकमधील सर्वाधिक धावसंख्येचा विजय. पूर्वीचा त्यांचा विजय ६७ धावांचा द. आफ्रिकेविरुद्ध होता.
०६बांगलादेश संघाने मिळविलेले ओडीआयमधील सलग विजय. यामध्ये गतवर्षी झिम्बाब्वेविरुद्ध त्यात पाच विजयांचा सुद्धा समावेश आहे.