बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत, बुमराहनं हुसेनला पाठवलं माघारी
By admin | Published: June 15, 2017 02:43 PM2017-06-15T14:43:30+5:302017-06-15T17:59:06+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेशमध्ये उपांत्यफेरीचा दुसरा सामना होत असून, भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घॆतला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 15 - चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेशमध्ये उपांत्यफेरीचा दुसरा सामना सुरू असून, भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगचा हा 300 वा सामना आहे. बांगलादेशचा आतापर्यंत निम्मा संघ तंबूत परतला आहे. सौम्या सरकार 0, तर शब्बीर रेहमान 19 धावा काढून बाद झाले आहेत. तर 70 धावांवर केदार जाधवनं तमीम इक्बालचा बळी मिळवला आहे. तसेच मुशफिकर रहीम 61 धावा, तर शाकीब अल हसन 15 धावांवर बाद झाला आहे. हुसेन 15 धावा काढून तंबूत परतला. भारताने उपांत्य फेरी पार केल्यास भारत-पाकिस्तानमध्ये अंतिम फेरीचा सामना रंगेल. पाकिस्तानने काल इंग्लंडला नमवून अंतिम फेरी गाठली.
कागदावर भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे बांगलादेशला विजयाचा दावेदार न समजणे चुकीचे ठरेल. भारतीय संघ या शेजारी देशाच्या संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. बांगलादेशने साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्ध दमदार पुनरागमन करताना विजय मिळवला होता, त्यामुळे या संघाला कमकुवत लेखणे चुकीचे ठरेल. या विजयासह बांगलादेशने उपांत्य फेरी गाठण्याच्या दिशेने वाटचाल केली होती.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे. भारतीय कामगिरीत सातत्य राखत बांगलादेशला धडा शिकविण्यास प्रयत्नशील राहील. भारतीय फलंदाज फॉर्मात असून गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत, क्षेत्ररक्षणही चांगले आहे. एकूण विचार करता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ खेळाच्या सर्वच विभागत अव्वल भासत आहे.
अशा परिस्थितीत नशिबाच्या जोरावर उपांत्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या मशरफी मुर्तजाच्या नेतृत्वाखालील संघाला एजबेस्टन क्रिकेट मैदानावर विशेष कामगिरी करावी लागेल. भारत विजेतेपदाचा दावेदार आहे, तर बांगलादेश संघ गुरुवारी विजय मिळविण्यात यशस्वी ठरला; तर त्यांच्या क्रिकेट इतिहासात हा सर्वात मोठ्या विजयांपैकी एक राहील. बांगलादेशने यापूर्वी आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड यांच्यासारख्या दिग्गज संघांचा पराभव केला आहे. हा योगायोग मानल्या गेला असला तरी, बांगलादेश संघ कुठल्याही क्षणी अशाप्रकारची कामगिरी करण्यास सक्षम आहे.
भारतीय संघ रविचंद्रन अश्विनला अंतिम ११ खेळाडूंमध्ये कायम ठेवते की, पुन्हा उमेश यादवला संघात पाचारण करते; याबाबत उत्सुकता आहे. कारण सराव सामन्यात उमेशच्या वेगवान माऱ्यापुढे बांगलादेशच्या फलंदाजांचा टिकाव लागला नव्हता. बांगलादेश संघाबाबत विचार करता त्यांचे लक्ष्य विश्वकप २००७ मध्ये पोर्ट आॅफ स्पेन येथे केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आहे. त्या वेळी बांगलादेशने सरशी साधत भारताला साखळी फेरीतच गाशा गुंडाळण्यास भाग पाडले होते. त्या संघातील चार सदस्य कर्णधार मशरफी मुर्तजा, शाकीब-अल-हसन, मुशफिकर रहीम व तमीम इकबाल सध्याच्या संघातील स्टार खेळाडू आहेत. गेल्या तीन वर्षांत वन-डे क्रिकेटमध्ये बांगलादेश संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. २०१५मध्ये मायदेशात खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान बांगलादेशने भारताचा २-१ ने पराभव केला होता.
मैदानावर भारत वरचढ
मैदानावरील कामगिरीची चर्चा केली, तर धवन व रोहित ही भारतीय सलामी जोडी बांगलादेशच्या तमीम इक्बाल व सौम्य सरकार यांच्या तुलनेत सरस आहे. दरम्यान, तमीम शानदार फॉर्मात आहे. कुणी स्वप्नातही कोहलीची तुलना इमरुल कायेस किंवा शब्बीर रहमान यांच्यासोबत करणार नाही.
महेंद्रसिंग धोनीची ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये महान खेळाडूंमध्ये गणना होते तर मुशफिकर रहीमला अद्याप कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. महमुदुल्लाह रियाद ‘मॅच विनर’ आहे. पण युवराज सिंग कारकिर्दीतील ३०० वा सामना खेळणार असून, तो पूर्णपणे वेगळा खेळाडू आहे.
मशरफी, तास्किन, रुबेल व मुस्ताफिजूर यांच्या रूपाने बांगलादेशकडे चांगला वेगवान मारा आहे. पण भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांच्या समावेशामुळे भारताची गोलंदाजीची बाजू मजबूत आहे.