बांगलादेशचा ऐतिहासिक विजय
By admin | Published: October 31, 2016 06:33 AM2016-10-31T06:33:34+5:302016-10-31T06:33:34+5:30
अष्टपैलू शाकीब-अल-हसन यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर यजमान बांगलादेश्ने इंग्लंडवर रविवारी १०८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
मिरपूर : आॅफस्पिनर मेहंदी हसन मिराज आणि अष्टपैलू शाकीब-अल-हसन यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर यजमान बांगलादेश्ने इंग्लंडवर रविवारी १०८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ऐतिहासिक विजयाबरोबरच बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
इंग्लंडवर कसोटीत विजय मिळवण्याची कसोटी इतिहासातील बांगलादेशची ही पहिली वेळ आहे. त्याचप्रमाणे २००० पासून कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांचा एकूण हा आठवा विजय ठरला.
इंग्लंड संघाने पहिल्या डावात २४४ धावा केल्या होत्या. बांगलादेशने दुसऱ्या डावात २९६ धावा करून पाहुण्या संघाला विजयासाठी २७२ धावांचे लक्ष्य दिले; परंतु इंग्लंडचा पूर्ण संघ ४५.३ षटकांत १६४ धावांत ढेपाळला. विजयाचा पाठलाग करताना इंग्लंडची एक वेळ १ बाद १०० अशी मजबूत स्थिती होती; परंतु मेहंदी हसन आणि शाकीब-अल-हसन यांच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडने पूर्ण शरणागती पत्करली आणि त्यांचे ९ फलंदाज ६४ धावांतच गमावले.
इंग्लंडकडून अॅलिस्टर कुक (५९) आणि बेन डकेट (५६) यांनी अर्धशतक ठोकले; परंतु बेन बाद होताच संघाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. कुक आणि डकेट यांच्याशिवाय बेन स्टोक्सने २५ धावा केल्या. इंग्लंडच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
आॅफस्पिनर मेहंदी हसन मिराजने पहिल्या डावात ६ बळी घेतले होते आणि दुसऱ्या डावातही जादूई गोलंदाजी करताना ६ फलंदाजांना तंबूत धाडले. त्याने दुसऱ्या डावात २१.३ षटकांत ७७ धावांत ६ गडी बाद केले. याशिवाय अष्टपैलू शाकीब-अल-हसनने १३ षटकांत ४९ धावांत ४ फलंदाजांना तंबूत धाडले.
१९ वर्षीय युवा स्पिनर मेहंदी हसन मिराजला त्याच्या शानदार कामगिरीबद्दल ‘सामनावीर’ आणि ‘मालिकावीर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
>संक्षिप्त धावफलक
बांगलादेश (पहिला डाव) २२० आणि दुसरा डाव २९६.इंग्लंड (पहिला डाव २४४), दुसरा डाव : ४५.३ षटकांत सर्व बाद १६४. (अॅलिस्टर कुक ५९, डकेट ५६, बेन स्टोक्स २५. मेहंदी हसन मिराज ६/७७, शाकीब-अल-हसन ४/४९).