बांगलाची सुपर टेनमध्ये धडक
By admin | Published: March 14, 2016 01:00 AM2016-03-14T01:00:48+5:302016-03-14T01:00:48+5:30
धडाकेबाज सलामीवीर तमीम इक्बाल याने झळकावलेल्या तडाखेबंद नाबाद शतकाच्या जोरावर बांगलादेशने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर टेन गटात प्रवेश करताना नवख्या ओमानला ५४ धावांनी नमवले
धरमशाला : धडाकेबाज सलामीवीर तमीम इक्बाल याने झळकावलेल्या तडाखेबंद नाबाद शतकाच्या जोरावर बांगलादेशने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर टेन गटात प्रवेश करताना नवख्या ओमानला ५४ धावांनी नमवले. विशेष म्हणजे, टी-२० मध्ये बांगलादेशकडून पहिला शतक झळकावलेल्या इक्बालची खेळी यंदाच्या विश्वचषकमधील पहिले शतक ठरले.
धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून ओमानने बांगलादेशला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. मात्र, इक्बालने त्यांचा हा निर्णय उलटवताना ६३ चेंडंूत नाबाद १०३ धावा फटकावत बांगलादेशला निर्धारित षटकांत २ बाद १८० धावांची आव्हानात्मक मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना अडखळती सुरुवात झालेल्या ओमानचा डाव ९ बाद ६५ धावांत रोखला गेला. ओमान फलंदाजी करत असताना दोनवेळा आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे त्यांना १२ षटकांत १२० धावांचे कठीण आव्हान मिळाले होते.
मधल्या फळीतील जतिंदर सिंग (२५) व अदनान इल्यास (१३) या दोघांचा अपवाद वगळता ओमानच्या एकाही फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. बांगलादेशने यावेळी टिच्चून मारा करताना ओमानला सहजपणे लोळवले. अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन याने ३ षटकांत १५ धावा देताना ४ बळी घेत ओमानचे कंबरडे मोडले.
याआधी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने इक्बालच्या धुवाधार फटकेबाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या गाठली. इक्बालने ६३ चेंडंूत १० चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद १०३ धावांचा तडाखा दिला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :
बांगलादेश : २० षटकांत २ बाद १८० धावा (तमीम इक्बाल नाबाद १०३, शब्बीर रहमान ४४; खवार अली १/२४, अजय लालचेता १/३५) वि.वि. (डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे) ओमान : १२ षटकांत ९ बाद ६५ धावा (जतिंदर सिंग २५, अदनान इल्यास १३; शाकिब अल हसन ४/१५)