निवृत्ती स्वीकारण्यास बाध्य केले : चंद्रपॉल
By admin | Published: February 4, 2016 03:43 AM2016-02-04T03:43:51+5:302016-02-04T03:43:51+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अलीकडेच निवृत्ती स्वीकारणारा विंडीजचा अनुभवी क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉलने त्याला निवृत्ती स्वीकारण्यास बाध्य करण्यात आले
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अलीकडेच निवृत्ती स्वीकारणारा विंडीजचा अनुभवी क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉलने त्याला निवृत्ती स्वीकारण्यास बाध्य करण्यात आले, असा धक्कादायक खुलासा केला आहे.
चंद्रपॉल म्हणाला, ‘मला विंडीज क्रिकेट बोर्डाने (डब्ल्यूआयसीबी) निवृत्ती स्वीकारण्यास भाग पाडले. पण, मी केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून, स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणे सुरू ठेवणार आहे.’
चंद्रपॉलने डब्ल्यूआयसीबीवर आरोप केला की, त्याने मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्यासाठी बोर्डाकडे ना-हरकत (एनओसी) प्रमाणपत्र मागितले. त्यावर बोर्डाने माझ्यापुढे निवृत्ती स्वीकारण्याची अट ठेवली. एनओसी देताना २३ जानेवारी रोजी निवृत्ती स्वीकारण्याची अट ठेवण्यात आली होती. जर मी निवृत्ती स्वीकारली नसती तर ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असते.’
४१ वर्षीय चंद्रपॉल म्हणाला, ‘डब्ल्यूआयसीबीचे आपल्या सिनिअर खेळाडूंप्रतीचे वर्तन योग्य नाही. त्यामुळे अनेक प्रमुख खेळाडू राष्ट्रीय संघाऐवजी विविध टी-२० लीगमध्ये सहभागी होत आहेत. मी सध्या एमसीएलमध्ये कुठल्याही दडपणाविना खेळत आहे. येथे मला पूर्ण सन्मान मिळत असून, रक्कमही चांगली मिळत आहे.’ चंद्रपॉल मे २०१५ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला नाही. डिसेंबर महिन्यात त्याला डब्ल्यूआयसीबीने करारबद्ध क्रिकेटपटूंच्या यादीतून वगळले होते.