बार्सिलोनाने पटकावले ‘कोपा डेल रे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:05 AM2018-04-23T00:05:10+5:302018-04-23T00:05:10+5:30
मेस्सी याने पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच एक तर सुआरेजने दोन गोल नोंदवले होते.
माद्रीद : स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी आणि लुई सुआरेजच्या शानदार गोलच्या बळावर बार्सिलोना संघाने सेविलाचा ५-० ने धुव्वा उडवला. याबरोबरच त्यांनी कोपा डेल रे फुटबॉल चषक पटकाविला. सामन्यात, मेस्सी याने पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच एक तर सुआरेजने दोन गोल नोंदवले होते. मेस्सी आणि सुआरेजच्या धडाक्यानंतर सेविला संघाचे मानसिक खच्चीकरण झाले. यातून ते अखेरपर्यंत सावरु शकले नाही. दुसऱ्या सत्रात, आंद्रेस इनिएस्टा व फिलिप कोटिन्हो याने प्रत्येक एक गोल नोंदवत सेविलाचा निराशाजनक पराभव निश्चित केला. बार्सिलोनाने हा एकूण ३० वा आणि सलग चौथा डेल रे चषक जिंकला आहे. बार्सिलोनाने सलग पाच वर्षांपासून फायनलमध्ये जागा मिळवली आहे.
इनिएस्टाचे निवृत्तीचे संकेत
बार्सिलोनाचा दिग्गज खेळाडू आन्द्रेस इनिएस्टा याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. संघाला कोपा डेल रे चषक मिळवून दिल्यानंतर हा खेळाडू आता चीनच्या एका क्लबशी जुळणार, असे वृत्त आहे. यावर मात्र या ३३ वर्षीय खेळाडूने आपण आपल्या भविष्यातील योजनांचा खुलासा आठवडाभरात करणार असल्याचे सांगितले. सेविला संघाविरुद्ध तो मैदानाबाहेर येत असताना त्याचे डोळे पाणावले होते. प्रेक्षकांनी उभे राहून त्याला अभिवादन केले.