भास्करन अधिबनचा कॅराकिनवर सनसनाटी विजय
By admin | Published: January 20, 2017 08:45 PM2017-01-20T20:45:45+5:302017-01-20T20:45:45+5:30
कारकिर्दीत प्रथमच फ्रेंच बचाव पद्धतीने खेळताना भारताचा ग्रँडमास्टर भास्करन अधिबन याने सर्जी कॅराकिन वर सनसनाटी विजय मिळवला.
Next
>- केदार लेले
टाटा स्टील बुद्धिबळ 2017 : पाचवी फेरी
लंडन, दि. 20 - कारकिर्दीत प्रथमच फ्रेंच बचाव पद्धतीने खेळताना भारताचा ग्रँडमास्टर भास्करन अधिबन याने सर्जी कॅराकिन वर सनसनाटी विजय मिळवला. तर पेंटाल्या हरिकृष्णला पराभूत करत वेस्ली सोने स्पर्धेत आघाडी घेतली.
लेवॉन अरोनियनने आघाडीवीर पॅवेल एल्यानॉव वर विजय मिळवला तसेच वॉएटशेक ने फ़ॅन वेली वर विजय मिळवला. अनुक्रमे नेपोम्नियाची वि. मॅग्नस कार्लसन, आंद्रेकिन वि. रॅपोर्ट आणि वुई वि. अनिष गिरी यांच्यातील लढती बरोबरीत सुटल्या.
कॅराकिन वि. अधिबन
जय्यत तयारीचा नमुना सादर करत अधिबन याने कॅराकिनला डावाच्या सुरुवातीलाच एकापाठोपाठ उत्कृष्ठ चाली रचत दोन-तीन वेळेस आश्चर्याचे धक्के दिले. कॅराकिन ने अधिबनच्या राजा विरुद्ध आक्रमण करण्यासाठी एका प्याद्याचा बळी दिला. कॅराकिन ने अधिबनच्या राजा विरुद्ध आक्रमण बळावण्यासाठी प्रथम आणखी एका प्याद्याचा बळी दिला; आणि नंतर त्याने (कॅराकिन ने) आपल्या हत्तीचा बळी सुद्धा दिला. पण अधिबनने बचाव आणि आक्रमक चालींचा सुंदर मिलाफ सादर केला. उत्कृष्ठ बचावात्मक आणि आक्रमक चाली रचल्यामुळे कॅराकिनचा डाव कोलमडला आणि त्याने अधिबन विरुद्ध शरणागती पत्करली.
पेंटाल्या हरिकृष्ण वि. वेस्ली सो
वेस्ली सो याने स्पर्धेत आघाडी घेताना पेंटाल्या हरिकृष्णला पराभूत केले. डावाच्या सुरुवातीलाच वेस्ली सो याने हरिकृष्ण विरुद्ध मोठी आघाडी मिळवली. पण वेस्ली सो याने काहीश्या कमकुवत चाली रचल्यामुळे हरिकृष्णला डावात बरोबरी साधण्याची नामी संधी चालून आली. पण वेळेच्या कचाट्यात अडकलेल्या हरिकृष्णने वेळेअभावी अश्वाची चूकीची चाल रचली केली. नेमकी हीच चूक निर्णायक ठरली आणि त्याच्या हातून डाव निसटला. हरिकृष्णने शरणागती पत्करली आणि वेस्ली सो याने पुर्ण गुण वसुल करत स्पर्धेत आघाडी घेतली.
पाचव्या फेरीअखेर गुणतालिका
1 वेस्ली सो - 4 गुण
2. कार्लसन, एल्यानॉव - 3.5 गुण प्रत्येकी
4, अरोनियन - 3 गुण
5. गिरी, हरिकृष्ण, आंद्रेकिन, वीई, कॅराकिन, वॉएटशेक - 2.5 गुण प्रत्येकी
11. नेपोम्नियाची, अधिबान - 2 गुण प्रत्येकी
13. रॅपोर्ट - 1.5 गुण
14. लोएक व्हॅन वेली - 0.5 गुण
शुक्रवार 20 जानेवारी 2017 रोजी - अशी रंगेल सहावी फेरी
लेवॉन अरोनियन वि. मॅग्नस कार्लसन
अधिबन भास्करन वि. वेस्ली सो
पेंटाला हरिकृष्ण वि. वॉएटशेक
लोएक वॅन वेली वि. दिमित्री आंद्रेकिन
रिचर्ड रॅपोर्ट वि. यी वुई
अनिष गिरी वि. इयान नेपोम्निच्ची
पॅवेल एल्यानॉव वि. सर्जी कॅराकिन