फलंदाजांची चमक, लंकेची सरशी
By admin | Published: June 9, 2017 04:14 AM2017-06-09T04:14:24+5:302017-06-09T04:14:24+5:30
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब गटाच्या लढतीत श्रीलंकेकडून सात गडी राखून अनपेक्षितरीत्या पराभवाचा सामना करावा लागला.
लंडन : गोलंदाजांच्या सुमार कामगिरीने भारताला गुरुवारी येथे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब गटाच्या लढतीत श्रीलंकेकडून सात गडी राखून अनपेक्षितरीत्या पराभवाचा सामना करावा लागला.
भारताने शिखर धवनच्या १२५ आणि रोहित शर्मा व महेंद्रसिंह धोनी यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ६ बाद ३२१ धावा बनवल्या. प्रत्युत्तरात श्रीलंका संघाने ४८.४ षटकांत विजयी लक्ष्य प्राप्त केले. त्यांच्या आघाडीच्या जवळजवळ सर्वच फलंदाजांनी विजयात योगदान दिले. वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वांत मोठा विजय ठरला. धनुष्का गुणतिलकाने ७२ चेंडूंत ७६, तर कुशल मेंडीसने ९३ चेंडूंत ८९ धावा केल्या. या दोघांनी १५९ धावांची भागीदारी करीत श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर कर्णधार अॅन्जोलो मॅथ्यूजने ४४ चेंडूंत नाबाद ५२, असेला गुणरत्ने याने २१ चेंडूंत नाबाद ३४ व कुशल परेराने ४७ (रिटायर्ड हर्ट) धावा केल्या. या स्पर्धेतील सनसनाटी निकालानंतर चारही संघांसाठी आता मैदान खुले झाले आहे. भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यापैकी कोणताही संघ आता उपांत्य फेरी गाठू शकतो. भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे लागेल. भारताकडून रवींद्र जडेजा व हार्दिक पंड्या निष्प्रभ ठरले. पंड्याने ७ षटकांत ५१ आणि जडेजाने ६ षटकांत ५२ धावा मोजल्या. या दोघांच्या सुमार गोलंदाजीचा श्रीलंकन फलंदाजांनी पुरेपूर लाभ घेतला. डावखुऱ्या गुणतिलकाने त्याच्या खेळीत ७ चौकार व २ षटकार मारले. नियमित गोलंदाज अपयशी ठरत असताना कर्णधार कोहली व केदार जाधव यांना गोलंदाजी करावी लागली. श्रीलंकेचे दोन फलंदाज धावबाद झाले. त्यात महेंद्रसिंह धोनीने चपळाईने गुणतिलकेला धावबाद केले भुवनेश्वरने अचूक थेटफेकीद्वारे मेंडीसला धावबाद केले. त्यानंतर कर्णधार मॅथ्यूज व परेरा यांनी १0.२ षटकांत ७५ धावांची भागीदारी करीत धावगती उंचावत ठेवली. परेरा रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर मॅथ्यूजने गुणरत्नेच्या साथीने श्रीलंकेला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, शिखर धवनच्या १२८ चेंडूतील १२५ धावांच्या बळावर भारताने ५० षटकांत ६ बाद ३२१ अशी मजल गाठली. धवनने रोहित शर्मा सोबत सलामीला १३८ धावांची भागीदाराी केली. रोहितने ७९ चेंडूत ७८ तसेच अखेरच्या टप्प्यात महेंद्रसिंग धोनीने ५२ चेंडूत ६३ धावा कुटल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीत धवनचे हे तिसरे शतक ठरले. मागच्या स्पर्धेत दोन शतके ठोकणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाने आज १५ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी केली. धवन-धोनी यांच्यात चौथ्या गड्यासाठी १०.४ षटकांत ८२ धावांची भागीदारी झाली. धोनीने सात चौकार आणि दोन षटकार मारले. केदार जाधवने देखील अवघ्या १३ चेंडूत नाबाद २५ धावांची खेळी केली हे विशेष. (वृत्तसंस्था)
>‘आम्हाला वाटले की आम्ही मोठी धावसंख्या उभारली. आम्हाला आमच्या गोलंदाजांवर विश्वास होता, पण श्रीलंकेने शानदार कामगिरी केली. त्यांनी फलंदाजीदरम्यान लय कायम राखली आणि योजनाबद्ध खेळ केला. आमची गोलंदाजी खराब होती, असे मला वाटत नाही, पण आम्हाला योजनाबद्ध खेळ करण्यात अपयश आले. विजयाचे श्रेय श्रीलंकेला द्यायलाच हवे.’
-भारतीय कर्णधार विराट कोहली
‘हा आमच्या सर्वोत्तम विजयापैकी एक आहे. भारताला पराभूत करण्यापेक्षा दुसरे काय चांगले असू शकते. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. कारण ३२२ धावांचे लक्ष्य गाठणे शक्य होते. आम्ही चांगल्या भागीदारी नोंदविल्यामुळे दडपण आले नाही.’
-श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज
>धावफलक
भारत :- रोहित शर्मा झे. परेरा गो. मलिंगा ७८, शिखर धवन झे. मेंडिस गो, मलिंगा १२५, विराट कोहली झे. डिकवेला गो. प्रदीप ००, युवराजसिंग त्रि. गो. गुणरत्ने ७, महेंद्रसिंग धोनी झे. चांदीमल गो. परेरा ६३, हार्दिक पांड्या झे. परेरा गो. लकमल ९, केदार जाधव नाबाद २५, रवींद्र जडेजा नाबाद ००, अवांतर: १४, एकूण: ५० षटकांत ६ बाद ३२१ धावा. गडी बाद क्रम: १/१३८, २/१३९, ३/१७९, ४/२६१, ५/२७८, ६/३०७. गोलंदाजी: मलिंगा १०-०-७०-२, लकमल १०-१-७२-१, प्रदीप १०-०-७३-१, एन. परेरा ९-०-५४-१, गुणतिलका ८-०-४१-०, गुणरत्ने ३-०-७-१.
श्रीलंका :- श्रीलंका : एन. डिकवेला झे. जडेजा गो. कुमार ७, एम. गुणतिलका धावबाद ७६, बी. मेंडीस धावबाद ८९, एम. परेरा रिटायर्ड हर्ट ४७, ए. मॅथ्यूज नाबाद ५२, डी. गुणरत्ने नाबाद ३४, अवांतर : १७, एकूण : ४८.४ षटकांत ३ बाद ३२२. गडी बाद क्रम : १-११, २-१७0, ३-१९६.गोलंदाजी : भुवनेश्वर १0-५४-१, यादव ९.४-0-६७-0, बुमराह १0-0-५२-0, पंड्या ७-१-५१-0, जडेजा ६-0-५२-0, जाधव ३-0-१८-0, कोहली ३-0-१७-0.