बंगळुरूच्या फलंदाजांना सहायक खेळपट्टी तयार करायला हवी
By admin | Published: April 17, 2017 01:19 AM2017-04-17T01:19:20+5:302017-04-17T01:19:20+5:30
गेल्या लढतीत मुंबई संघाने बंगळुरूचा पराभव केला. छोट्या लक्ष्याचा बचाव करताना हॅट््ट्रिकही उपयुक्त ठरली नाही. संघात पुनरागमन करणाऱ्या कोहलीने सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न केला
रवी शास्त्री लिहितात...
गेल्या लढतीत मुंबई संघाने बंगळुरूचा पराभव केला. छोट्या लक्ष्याचा बचाव करताना हॅट््ट्रिकही उपयुक्त ठरली नाही. संघात पुनरागमन करणाऱ्या कोहलीने सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो अपयशी ठरला. आता बंगळुरू संघाला काही खडतर निर्णय घ्यावे लागतील. गेल्या चारपैकी तीन सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. उर्वरित १० पैकी पाच सामने त्यांना गृहमैदानावर खेळायचे आहेत. आतापर्यंत गृहमैदानावर खेळल्या गेलेल्या दोन लढतींमध्ये खेळपट्टीकडून विशेष साथ लाभली नाही. खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल ठरली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चाहत्यांनी जल्लोष करण्याची तयारी केली असताना त्यांना शोकसभेचे निमंत्रण मिळाल्याचे चित्र दिसले. गृहमैदानावर एक लढत दिवसा तर एक सायंकाळच्या सत्रात खेळल्या गेली. मी कॉलम लिहित असताना रविवारी रात्री लढत सुरू झालेली असेल आणि सर्वांची नजर खेळपट्टीवर राहील. गेल्या लढतीत चेंडू बॅटवर थांबून येत होता. ख्रिस गेलसारख्या फलंदाजासाठी ही खेळपट्टी उपयुक्त नव्हती. चेंडूला उसळी मिळणाऱ्या खएळपट्टीवर त्याला खेळणे आवडते. बंगळुरूच्या आघाडीच्या फळीसाठी गेल महत्त्वाचा आहे. संघव्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. मोठ्या रकमेला करारबद्ध करण्यात आलेला तिमल मिल्सला विशेष छाप सोडता आलेली नाही. मिल्सची ताकद वेगवान मारा असून अशा खेळपट्टीवर तो ओझे वाटत आहे.
दरम्यान, बद्री व चहल सध्या खूश असतील. चहलला एक वेगळ्या प्रकारची लय हवी असते. त्याला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये फुल लेंथ गोलंदाजी करणे आवडते, पण सोबतच चेंडू फलंदाजांपासून दूर ठेवणे आवश्यक असते. या स्पर्धेत नेगी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. त्याचे मनोधैर्य कायम राखणे महत्त्वाचे आहे. बंगळुरूच्या क्युरेटरने आपल्या फलंदाजाना सहायक खेळपट्टी तयार करायला हवी. गरज भासली तरी त्यांनी नवी खेळपट्टी तयार करणे उपयुक्त ठरेल. गेलला गृहमैदानावरील चाहत्यांचे मनोरंजन करण्यापासून रोखायला नको. प्रतिस्पर्धी संघ बंगळुरू संघापासून सावध नाहीत, असे नाही. हा सर्वांत धोकादायक संघ आहे. प्रमुख फलंदाजांना गृहमैदानावरच अनुकूल वातावरण मिळत नसल्याचे चित्र आहे. (टीसीएम)