मुंबई इंडियन्सचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय
By admin | Published: April 9, 2016 07:43 PM2016-04-09T19:43:06+5:302016-04-09T19:51:57+5:30
इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रातील सलामीच्या सामन्याला सुरुवात झाली आहे, बई इंडियन्सने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ९ - इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रातील सलामीच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि नव्यानेच स्पर्धेत खेळत असलेल्या राइजिंग पुणे सुपरजायंटस् यांच्यातील लढतीने आयपीएलच्या नवव्या सत्राचे बिगुल वाजले आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या या सत्रातील हा पहिलाच सामना असल्याने विजयाने आपली घोडदौड सुरु करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. वानखेडे मैदानावर हा सामना रंगत आहे.
यजमान व गतविजेत्या मुंबई इंडियन्सची धुरा धडाकेबाज रोहित शर्माकडे असून ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज रिकी पाँटींग संघाच्या प्रशिक्षकपदी आहे. अंबाती रायडू, जोस बटलर आणि कोरी अँडरसन, केरॉन पोलार्ड व हार्दिक पांड्या अशा तीन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश मुंबई संघात असल्याने प्रतिस्पर्धी संघापुढे मोठे आव्हान असेल. जसप्रीत बुमराह, अँडरसन, टीम साऊदी, मिशेल मॅकलेनघन आणि मर्चेंट डी लांगे यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. तर फिरकीमध्ये हरभजन सिंगवर संघाची मदार राहील.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूला राइजिंग पुणे सुपराजायंटस्चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा संघाचा हुकमी एक्का आहे. शिवाय अजिंक्य रहाणे, केविन पीटरसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्शल आणि फाफ डू प्लेसिस अशा तगड्या खेळाडूंची फौजही त्यांच्याकडे आहे.
मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (कर्णधार), लिंडेल सिमंस, केरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, हार्दिक पांड्या, हरभजन सिंग, मिशेल मॅक्लीनघन, जोस बटलर, श्रेयस गोपाल, आर विनय कुमार
राइजिंग पुणे सुपरजायंट्स :
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, केविन पीटरसन, फाफ डु प्लेसिस, स्टीव स्मिथ, मिशेल मार्श, आर अश्विन, ईशांत शर्मा, आर पी सिंह, रजत भाटिया, मुरुगन अश्विन