गुजरातकडून ‘लॉयन्स’सारखी फलंदाजी अपेक्षित
By admin | Published: May 4, 2017 12:32 AM2017-05-04T00:32:15+5:302017-05-04T00:32:15+5:30
दिल्ली डेअरडेव्हिल्सने गतविजेत्या सनरायजर्सवर रोमहर्षक विजयाची नोंद करीत प्ले आॅफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या
- सुनील गावसकर -
दिल्ली डेअरडेव्हिल्सने गतविजेत्या सनरायजर्सवर रोमहर्षक विजयाची नोंद करीत प्ले आॅफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या विजयात सर्वांचे योगदान लाभल्याने सांघिक प्रयत्नांचे फळ असे विजयाचे वर्णन करावे लागेल. क्षेत्ररक्षणातील काही गलथानपणा सोडल्यास गोलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. नंतर १८६ धावांचे लक्ष्य फलंदाजांनी देखील लीलया गाठले.
युवा खेळाडूंनी आकर्षणाचे केंद्र बनण्याऐवजी कामगिरीच्या बळावर सामने जिंकून द्यावेत अशी मेंटर राहुल द्रविडची अपेक्षा असेल. त्याला कारणही तसेच आहे. संजू सॅमसन, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि करुण नायर यांच्याकडे कमालीचे टॅलेंट आहे. पण
सामना संपविण्यापर्यंत खेळपट्टीवर राहण्याचे कसब शिकावे लागेल. मोक्याच्या क्षणी हे खेळाडू बाद झाल्यानंतरही अनुभवी कोरी अॅण्डरसन तसेच ख्रिस मॉरिस यांनी विजयावर शिक्कामोर्तब करण्याइतपत संयम पाळला.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे मोहम्मद शमी सध्या संघाबाहेर होता. काल त्याचे बाऊन्सर आणि यॉर्कर पाहताना मन प्रसन्न झाले. तो राष्ट्रीय संघात पुनरागमन करू शकेल याची खात्री देखील पटली. अनेक भारतीय गोलंदाज यॉर्कर चांगल्या तऱ्हेने टाकू शकतात हे पाहताना फार बरे वाटत आहे. टी-२० मध्ये अलगद यॉर्कर टाकणे सोपे नसते. थोडीही चूक झाली की चेंडू सीमापार गेला म्हणून समजा. पण अचूकपणे यॉर्कर टाकला की धावा वाचविण्यासही मदत होते. भारताचे युवा गोलंदाज अचूक टप्प्यावर यॉर्कर टाकू शकतात यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
मुंबईविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभूत झालेल्या गुजरातसाठी आता स्वबळावर मुसंडी मारणे गरजेचे झाले आहे. दिल्लीचा कमकुवतपणा क्षेत्ररक्षण आहे पण गुजरात संघ क्षेत्ररक्षणात खऱ्या अर्थाने लॉयन्स ठरला. जडेजा आणि रैनाच्या क्षेत्ररक्षणातील कामगिरीच्या बळावरच मुंबईला त्यांनी सुपर ओव्हरपर्यंत त्रास दिला होता. स्पर्धेत कायम राहण्यासाठी या संघाला फलंदाजीत आणखी चाणाक्षपणा दाखविण्याची गरज असेल.
जहीर खान दिल्ली संघात परतण्याची शक्यता असल्याने आज गुरुवारी गुजरातसाठी मोठ्या धावा उभारणे शक्य होईल, असे वाटत नाही. पण सहकाऱ्यांनी ‘लॉयन्स’सारखी फटकेबाजी केली नाही तर मात्र ‘शेळी’बनून स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ गुजरातवर येऊ शकते. (पीएमजी)