बंगाल वॉरियर्सचा झुंजार विजय
By Admin | Published: February 5, 2016 03:40 AM2016-02-05T03:40:03+5:302016-02-05T03:40:03+5:30
बंगाल वॉरियर्सने लढवय्या खेळ करताना पिछाडीवरून बाजी मारत बंगळुरू बुल्सला ३४-२४ असा धक्का देऊन प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात सलग दुसरा
बंगळुरू : बंगाल वॉरियर्सने लढवय्या खेळ करताना पिछाडीवरून बाजी मारत बंगळुरू बुल्सला ३४-२४
असा धक्का देऊन प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात सलग दुसरा विजय नोंदवला. बंगालने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली असून, बंगळुरूची ७व्या स्थानी घसरण झाली. विशेष म्हणजे सलग दुसऱ्यांदा बंगळुरूला घरच्या मैदानावर हार पत्करावी लागली.
श्री कांतीरवा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात यजमानांनी मध्यांतरापर्यंत वर्चस्व राखले होते. चौथ्या मिनिटापासून घेतलेली आघाडी यजमानांनी ३०व्या मिनिटापर्यंत कायम राखली होती. मात्र येथून बंगालच्या कोरियन आक्रमक जँग कुन ली याने धडाकेबाज चढायांच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटले.
मध्यांतराला बंगळुरूने १३-१२ अशी एका गुणाची नाममात्र आघाडी घेतली होती. या वेळी काहीसे आक्रमक झालेल्या यजमानांनी बंगळुरूवर लोण चढवण्याच्या तब्बल तीन संधी वाया घालवल्या. दखल घेण्याची बाब म्हणजे बंगळुरूचा सुरजीत नरवाल दोन वेळा एकटाच मैदानात होता. तरीही त्याने सुपर टॅकेल करून संघाची गुणसंख्या वाढवली. या वेळी बंगळुरू बाजी मारणार असे चित्र होते. मात्र बंगालने आक्रमणाची धार वाढवताना बंगळुरूवर लोण चढवला. हाच सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला.
३१व्या मिनिटापासून घेतलेली आघाडी बंगाल वॉरियर्सने अखेरपर्यंत टिकवली. कून लीने खोलवर चढाया करताना बंगळुरूचा बचाव पूर्णपणे भेदला. सामना संपण्यास ५ मिनिटे शिल्लक असताना त्याने दोन गुणांची कमाई केली. बंगालने ३९व्या मिनिटाला बंगळुरूवर दुसरा लोण चढवून विजयावर शिक्कामोर्तब
केले.
लीसह नितीन तोमरचे आक्रमण आणि नीलेश शिंदे व गिरीश एर्नाक यांचा भक्कम बचाव बंगालच्या विजयात मोलाचे ठरले. तर यजमानांकडून अमित राठी, सुरजीत नरवाल व सोमवीर यांची झुंज अपयशी ठरली.