विराट कोहलीविरुद्ध केन विलियम्सन यांच्यात वर्चस्वाची लढाई

By admin | Published: September 21, 2016 07:13 PM2016-09-21T19:13:11+5:302016-09-21T21:01:25+5:30

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांनी मातब्बर फलंदाज म्हणून स्वत:चा ठसा उमटविला.

The battle against Virat Kohli, against William W. Williamson | विराट कोहलीविरुद्ध केन विलियम्सन यांच्यात वर्चस्वाची लढाई

विराट कोहलीविरुद्ध केन विलियम्सन यांच्यात वर्चस्वाची लढाई

Next

ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि. २१ : भारतीय कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांनी मातब्बर फलंदाज म्हणून स्वत:चा ठसा उमटविला. यशस्वी कर्णधार या नात्याने मालिकेत कोण सरस ठरणार हे गुरुवारपासून ग्रीनपार्कवर सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीद्वारे सिद्ध होणार आहे.

तीन सामन्यांची कसोटी मालिका आपणच जिंकू असा दोन्ही संघांचा दावा आहे. उभय संघात दमदार खेळाडूंचा भरणा आहे. तथापि न्यूझीलंडचा भारतातील रेकॉर्ड फारसा चांगला नसल्याने सध्यातरी मालिकेत विराटच्या नेतृत्वाखालील टीम
इंडियाचेच पारडे जड वाटते. विंडीजविरुद्ध चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजय मिळवून देणाऱ्या विराटचा फलंदाज आणि कर्णधार म्हणून भारतात रेकॉर्ड चांगलाच आहे.

न्यूझीलंडविरुद्ध त्याने मालिका जिंकून दिल्यास भारताचा मालिका विजयाचा चौकार ठरेल. विराटने श्रीलंका दौऱ्यात २२ वर्षानंतर २-१ ने विजय मिळवून दिला. द. आफ्रिकेवर स्थानिक मालिकेत ३-० ने आणि त्यानंतर विंडीजमध्ये २-०
ने सरशी साधून दिली होती. दुसरीकडे विलियम्सनवर भारतात आपल्या संघाला मालिका विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी असेल.

या मालिकेत ज्यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल त्यात विराटसह रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पूजारा यांचा समावेश आहे. रोहित आणि शिखर फ्लॉप असताना निवड समितीने दोघांवर विश्वास टाकला.
चेतेश्वर पूजाराची कामगिरीही फारशी चांगली नव्हती. पण त्यानंतर दुलिप करंडक स्पर्धेत नाबाद २५६ धावा ठोकून संघात दाखल झाला. विंडीज दौऱ्यातील संघ या मालिकेतही खेळताना दिसेल. या दौऱ्यात लोकेश राहुल हा विराटनंतर सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज होता.

फलंदाजीसोबतच गोलंदाजी देखील भारतीय विजयाचे गणित ठरविणार आहे. ईशांत शर्मा चिकुनगुनियाची लागण होताच बाहेर पडल्यानंतर भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. न्यूझीलंडला सलामीवीरांची समस्या भेडसावते आहे. मार्टिन गुप्तिल फॉर्ममध्ये नसल्याने ल्यूक रोंचीला प्राधान्य दिले जाईल. केन मात्र
जगातील चार दिग्गज फलंदाजांमध्ये कायम असल्याने त्याचे योगदान संघाच्या हितावह ठरेल. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, ईश सोढीआणि ड्रग ब्रेसवेल यांच्या कामगिरीवर नजर असेल.

उभय संघ
न्यूझीलंड: केन विलियम्सन (कर्णधार),ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, मार्क क्रेग, मार्टिन गुप्तिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, ल्यूक रोंची, मिशेल सेंटनर, ईश सोढी, रॉस टेलर, नील वॅगनर आणि बीजे वॉटलिंग.

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादव.

सामना: भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० पासून.


आमने-सामने
न्यूझीलंडने भारतात ३१ कसोटी सामने खेळले. केवळ दोन सामने जिंकले.
भारतात १९८८ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यांनी अखेरचा विजय नोंदविला.
त्यानंतर भारतात खेळल्या गेलेल्या १४ कसोटींपैकी सहा सामने भारताने जिंकले. आठ सामने अनिर्णीत राहिले.
भारत-न्यूझीलंड संघात झालेल्या अखेरच्या तिन्ही कसोटींत भारताने विजय नोंदविला. पाहुण्यांचे नशीब पालटण्याची जबाबदारी आता केनवरच्या खांद्यावर असेल.

लक्षवेधी...
भारताची ही ५०० वी कसोटी!  कसोटी क्रिकेटची सुरुवात भारतीय संघाने १९३२ साली केली. २२ सप्टेंबर २०१६ रोजी ५०० वा सामना खेळणारा भारतीय संघ जगातील चौथा देश ठरणार आहे.

पिच रिपोर्ट...
ग्रीन पार्कची खेळपट्टी शुष्क आहे. क्यूरेटरने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी नागपूरची खेळपट्टी जशी ह्यटर्नह्ण झाली तसे येथे पहायला मिळणार नाही. वेगवान गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगची मदत मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास उमेश यादवला प्राधान्य दिले जाईल. टर्र्निंग ट्रॅक लक्षात घेता भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह पाच गोलंदाज खेळविण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: The battle against Virat Kohli, against William W. Williamson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.