केकेआर-सनराइजर्स यांच्यात वर्चस्वाची लढाई
By admin | Published: April 15, 2017 04:31 AM2017-04-15T04:31:30+5:302017-04-15T04:31:30+5:30
आत्मविश्वास उंचावलेला कोलकाता नाईट रायडर्स वर्चस्वाच्या लढाईत आज शनिवारी आयपीएल-१० मध्ये सनराइजर्स हैदराबादला धूळ चारण्याच्या इराद्याने उतरणार
कोलकाता : आत्मविश्वास उंचावलेला कोलकाता नाईट रायडर्स वर्चस्वाच्या लढाईत आज शनिवारी आयपीएल-१० मध्ये सनराइजर्स हैदराबादला धूळ चारण्याच्या इराद्याने उतरणार आहे. हा सामना म्हणजे गोलंदाजांना श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची संधी असेल शिवाय केकेआरला मागच्या सत्रातील एलिमिनेटरमधील पराभवाची परतफेड देखील करायची आहे.
एक विजय आणि एका पराभवासह वाटचाल करणाऱ्या दोनवेळेच्या विजेत्या केकेआरने काल रात्री ईडन गार्डनवर किंग्स इलेव्हन पंजाबला २१ चेंडू शिल्लक राखून आठ गड्यांनी पराभूत केले. घरच्या मैदानावर संघाचा हा सलग ११ वा विजय होता. कर्णधार गौतम गंभीरने या सामन्यात सुनील नारायणला सलामीला खेळविण्याचा ‘मास्टर स्ट्रोक’ खेळला. दोघांनी ‘पॉवर प्ले’मध्ये ७६ धावा कुटल्या. नारायणने १८ चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांसह ३७ धावांचे योगदान दिले. ईडनच्या खेळपट्टीवर उमेश यादवने चार गडी बाद केले.
सनराइजर्सकडेही भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांच्या रूपात उत्कृष्ट वेगवान आणि फिरकी गोलंदाज आहेत. राशिदने तीन सामन्यात १३ गडी बाद केले तर पर्पल कॅपवर हक्क गाजवित असलेल्या भुवनेश्वरने निर्णायक षटकांत शानदार मारा केला. त्याच्या सोबतीला आशिष नेहरा आणि मुस्तफिजूर रहमान हे आहेतच. केकेआरचा सनराइजर्सविरुद्ध जय पराजयाचा रेकॉर्ड ६-३ असा आहे. पण याआधीच्या सामन्यात सनराइजर्सने सरशी साधली हे विशेष.(वृत्तसंस्था)