बीसीसीआय योग्य प्रक्रियेचा अवलंब करीत आहे
By admin | Published: May 26, 2017 03:33 AM2017-05-26T03:33:29+5:302017-05-26T03:34:09+5:30
मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) योग्य प्रक्रियेचे पालन करीत आहे.
लंडन : ‘मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) योग्य प्रक्रियेचे पालन करीत आहे. कारण, विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर समाप्त होत आहे,’ असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.
कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने गतमोसमात १७ कसोटी सामन्यांपैकी १२ सामने जिंंकले आहेत. तरी, बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी आवेदन मागण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर एक गोष्ट निश्चित झाली आहे, की अनिल कुंबळे यांच्या कार्यकाळामध्ये कोणतीही वाढ होणार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये कोहलीला कुंबळे यांच्या कार्यकाळाबाबत विचारण्यात आले. या वेळी कोहलीने म्हटले की, ‘जेव्हापासून मला कळायला लागले, तेव्हापासून माझ्या माहितीप्रमाणे मागील कित्येक वर्षांपासून याच प्रकारची प्रक्रिया सुरू ठेवण्यात
आली आहे. गेल्या वेळीही हीच प्रक्रिया कायम ठेवण्यात आली होती. कार्यकाळ एका वर्षाचा होता आणि निश्चितच ही प्रक्रियाही तशीच असेल.’ (वृत्तसंस्था)
हार्दिक पंड्या आणि केदार जाधव यांच्या संघातील समावेशामुळे फलंदाजीसाठी खालचा मध्यमक्रम मजबूत झाला आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीवर मॅच फिनिश करण्याचा दबाव कमी होणार आहे. आम्ही खालचा मध्यक्रम मजबूत करण्याच्या दृष्टीनेच हे बदल केले आहेत. आम्हाला वाटते की, गेल्या दोन वर्षांपासून महेंद्रसिंह धोनीवर खूप दबाव आला होता. धोनी स्वत:ला सिद्ध करू शकत नव्हता कारण असे संघात खेळाडू नव्हते की जे त्याच्याबरोबर मॅच फिनिश करण्याचा संयम दाखवू शकत होते, असेसुद्धा विराटने सांगितले.