डीआरएस वादावरून आता बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया आमनेसामने
By admin | Published: March 8, 2017 07:00 PM2017-03-08T19:00:20+5:302017-03-08T19:00:20+5:30
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळण्यात आलेल्या टेस्ट सीरिजमधला डीआरएसवरचा चीटिंगचा वाद चांगलाच चिघळला आहे.
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 8 - भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळण्यात आलेल्या टेस्ट सीरिजमधला डीआरएसवरचा चीटिंगचा वाद चांगलाच चिघळला आहे. या वादावर दोन्ही क्रिकेट टीमचे कॅप्टन आमने-सामने आले आहेत. बुधवारी सर्वात आधी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं याला सुरुवात केली. स्टीव्ह स्मिथला डीआरएस वादावर टीम इंडियानं कोंडीत पकडल्यामुळे त्याच्या बचावासाठी आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुढे आली आहे. त्यानंतर बीसीसीआयनंही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड आज उघडपणे स्मिथच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत. ते म्हणाले, स्टीव्ह स्मिथ हा गुणवान खेळाडू असून, त्याचं व्यक्तिमत्त्वंही चांगलं आहे. उत्तम खेळ आणि चांगल्या व्यवहारामुळे अनेक लोकांसाठी तो आदर्श आहे. बंगळुरू टेस्टमध्ये रिव्ह्यूच्या वेळी जे काही झालं ते स्टीव्ह स्मिथनं जाणूनबुजून केलं नाही. त्यानंतर त्यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, विराट आणि टीम इंडियाकडून स्मिथवर लावण्यात आलेले आरोप आश्चर्यचकित करणारे आहेत. विराटनं स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाची टीम, ड्रेसिंग रूमवर लावलेल्या आरोपांमुळे त्यांच्याच प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली आहे. सदरलँडसोबत ऑस्ट्रेलियाचे कोच डेरेन लीमेन यांनी विराटच्या आरोपांचं खंडन केलं आहे. त्यानंतर बीसीसीआयनंही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
(...म्हणून स्टिव्ह स्मिथवर भडकला विराट कोहली)
(भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी वाद)
बीसीसीआय म्हणाले, आम्ही व्हिडीओ पाहिला आहे. ज्यात स्टिव्ह स्मिथ जाणूनबुजून ड्रेसिंग रुमकडे इशारा करत सल्ला मागतो आहे. त्यामुळे आम्ही खंबीरपणे कर्णधार विराट कोहली आणि टीम इंडियासोबत उभे आहोत. विराट कोहली हा एक परिपक्व आणि अनुभवी क्रिकेटर आहे. मैदानावरील त्यांची वागणूक ही दुस-यांसाठी उदाहरण आहे. त्यावेळी विराटच्या प्रतिक्रियेला मैदानावरील पंच निजल लाँग यांनी समर्थन दिलं होतं आणि ते स्मिथला रोखण्यासाठी त्याच्याजवळ गेले होते. बीसीसीआयनं आयसीसीकडेही यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया टीममध्ये नेहमीच वाद होत असतात. यापूर्वी 2008च्या सीरिजमध्येही असाच वाद झाला होता.