बीसीसीआयचा विरोध कायम आयसीसीची बदलास मंजुरी
By admin | Published: February 5, 2017 04:01 AM2017-02-05T04:01:05+5:302017-02-05T04:01:05+5:30
बीसीसीआयचे प्रतिनिधी विक्रम लिमये यांनी कडाडून विरोध केला असला तरी आयसीसी बोर्डाच्या अनेक सदस्यांनी पुनर्गठित महसूल वितरण मॉडेलच्या बाजूने मतदान केले.
नवी दिल्ली : बीसीसीआयचे प्रतिनिधी विक्रम लिमये यांनी कडाडून विरोध केला असला तरी आयसीसी बोर्डाच्या अनेक सदस्यांनी पुनर्गठित महसूल वितरण मॉडेलच्या बाजूने मतदान केले. विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला केवळ श्रीलंकेने पाठिंबा दिला. हा प्रस्ताव मतदानासाठी ठेवण्यात आला, त्यावेळी झिम्बाब्वेचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. पाकिस्तान, न्यूझीलंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड व आॅस्ट्रेलिया या सर्व सदस्यांनी महसूल वितरणाच्या पद्धतीमध्ये बदल करण्याच्या बाजूने मतदान केले.
आयसीसी बोर्डाने शनिवारी महसूल वितरणाच्या पद्धतीमध्ये बदल करण्याच्या मुद्यावर चर्चा केली. त्यात भारत, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या ‘बिग थ्री’ बोर्डांना महसुलामध्ये मोठा वाटा मिळत होता. ‘बिग थ्री’ मॉडेलला कसोटी खेळणाऱ्या अन्य देशांच्या बोर्डांसह इंग्लंड व आॅस्ट्रेलियानेही विरोध केला.
लिमये यांनी सांगितले, की ‘मी बोर्डाला स्पष्ट केले, की अधिकृत नोंद असलेल्या कागदपत्रांचे समर्थन करू शकत नाही. हे कागदपत्र विश्वास व समानतेवर आधारित आहेत. मी आत्ताच कार्यभार सांभाळलेला असून कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी मला वेळ आवश्यक आहे. त्यामुळे सदस्य व अध्यक्षांना माझ्याबाबत सहानुभूती आहे.’
लिमये पुढे म्हणाले, ‘अध्यक्ष शशांक मनोहर म्हणाले, की ते अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करीत आहेत. हा मुद्दा मतदानासाठी ठेवण्यात आला आणि मी बदलाच्या विरोधात मतदान केले. बैठकीच्या अहवालामध्ये याचा उल्लेख आहे. मी कुठल्या बाजूने मतदान केले, हे सांगणे योग्य नाही.’
आयसीसी एप्रिल महिन्यात बोर्डाच्या बैठकीदरम्यान हा प्रस्ताव पारित करणार आहे. दरम्यान, या प्रस्तावानंतरही बीसीसीआयला दोन हजार कोटींपेक्षा अधिक राशी मिळण्याची आशा आहे. (वृत्तसंस्था)