‘लोढा शिफारशीं’ना बीसीसीआयचा ठेंगा
By admin | Published: October 2, 2016 02:59 AM2016-10-02T02:59:39+5:302016-10-02T02:59:39+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शनिवारी झालेल्या विशेष आम सभेत मुख्य तीन शिफारशी अमान्य करून लोढा समितीला ठेंगा दाखविण्यात आला.
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शनिवारी झालेल्या विशेष आम सभेत मुख्य तीन शिफारशी अमान्य करून लोढा समितीला ठेंगा दाखविण्यात आला. परंतु या सभेत समितीच्या इतर किरकोळ शिफारशींना मात्र मान्यता देण्यात आली.
वानखेडे स्टेडियम येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या या विशेष आम सभेत लोढा समितीने शिफारस केलेल्या एक राज्य-एक मत, ७0 वर्षे वयोमर्यादा, प्रशासकांसाठी तीन वर्षांचा कूलिंग पिरीयड यासह निवड समितीत पाचऐवजी तीन सदस्यांविषयीच्या नियमांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
विशेष आम सभा शुक्रवारी होणार होती; परंतु ती शनिवारपर्यंत टाळण्यात आली होती. मंडळाने ते सुधारणा लागू करण्याच्या बाजूचे आहेत आणि गेल्या १८ महिन्यांपासून त्यांनी अनेक सुधारणा केल्या असल्याचे सांगितले. बैठकीत प्लेअर्स असोसिएशनची स्थापना करणे, काही दुरुस्तीसह एपेक्स कौन्सिलची स्थापना करणे, कंट्रोलर आणि आॅडिटर जनरलच्या प्रतिनिधीला एपेक्स कौन्सिलसोबत आयपीएल संचालन परिषदेत समाविष्ट करणे याविषयी सर्वसंमतीने मान्यता देण्यात आली.
बैठकीत बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी न्या. लोढा समितीद्वारे प्रस्तावित नवा मसुदा सादर केला. त्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीदेखील समर्थन केले. बीसीसीआयने आपल्या निवेदनात ९ शिफारशींची यादी दिली आहे. त्यास सर्वसंमतीने मान्यता देण्यात आली. मान्य करण्यात आलेल्या शिफारशींत कंप्ट्रोलर आणि आॅडिटर जनरलच्या प्रतिनिधीला एपेक्स कौन्सिलबरोबरच आयपीएल संचालन परिषदेत समाविष्ट करणे तसेच एपेक्स कौन्सिलची स्थापना काही दुरुस्त्यांसह केली जाणार आहे. लोढा समितीच्या शिफारशींनुसार विविध समित्या स्थापन केल्या जातील.