बीसीसीआयची आयसीसीकडे तक्रार
By admin | Published: March 10, 2017 06:29 AM2017-03-10T06:29:00+5:302017-03-10T06:29:00+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ व पीटर हँड्सकोम्ब यांच्याविरुद्ध डीआरएससाठी ड्रेसिंग रुमकडून मदत
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ व पीटर हँड्सकोम्ब यांच्याविरुद्ध डीआरएससाठी ड्रेसिंग रुमकडून मदत मागितल्याच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) गुरुवारी अधिकृत तक्रार केली.
आयसीसीने बुधवारी भारतीय कर्णधार विराट कोहली व आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर बीसीसीआयने आज घेतलेला निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने कागदपत्रांसह या घटनेचे व्हीडिओ फुटेज आयसीसीला ई-मेल केले असून, जागतिक क्रिकेटचे संचालन करणाऱ्या संस्थेच्या आचारसंहितेनुसार लेव्हल दोनचा आरोप निश्चित करण्यास सांगितले आहे.
बीसीसीआयच्या नजिकच्या सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की,‘बीसीसीआयने गुरुवारी स्मिथ व हँड्सकोम्बाविरुद्ध आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. हँड्सकोम्ब रिव्ह्यू घेण्यासाठी ड्रेसिंग रुमची मदत घेण्याचा इशारा करीत असून, पंच नायजल लाँग हस्तक्षेप करीत असल्याचे व्हीडिओ फुटेज आयसीसीला पाठविण्यात आले आहे.’
सूत्राने पुढे सांगितले की,‘बीसीसीआयला अधिकृत तक्रार दाखल करण्याचा अधिकार असून, त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केला आहे. कारण लेव्हल दोनच्या आरोपाची तक्रार सामना संपल्यानंतर ४८ तासांच्या आत दाखल करता येते.’
बीसीसीआयने खिलाडूवृत्तीची पायमल्ली करणे आणि खेळाला बदनाम करणे, असे आरोप लावले असल्याचे सूत्राने स्पष्ट केले.
आयसीसी या तक्रारीची दखल घेणार का, याबाबत बोलताना सूत्राने सांगितले की,‘नियमानुसार सदस्य बोर्डाच्या सीईओला लेव्हल दोनच्या आरोपाच्या प्रकरणात ४८ तासांच्या आत तक्रार दाखल करता येते. बीसीसीआयने त्याच अधिकाराचा वापर केला. या व्यतिरिक्त पीटर हँड्सकोम्बने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवर आपली चूक कबूल केली आहे. या व्यतिरिक्त आयसीसीने ४८ तास प्रतीक्षा का केली.’
क्रिकेट आॅस्ट्रेलियाने स्मिथची पाठराखण करण्यासाठी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे बीसीसीआय नाराज असल्याचे वृत्त आहे.
बीसीसीआयच्या मते आपल्या कर्णधाराची पाठराखण करणे योग्य आहे, पण त्यांचे वक्तव्य कोहलीला कमी लेखणारे आहे. आॅस्ट्रेलियन बोर्डाचे हे वक्तव्य यजमान संघाला रुचलेले नाही.
भारतीय संघव्यवस्थापनाला आशा होती की, सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड सामना संपल्यानंतर स्मिथला बोलावतील व कारवाई करतील, पण तसे घडले नाही.
ब्रॉड यांनी आॅस्ट्रेलियन मीडियाला दिलेले वक्तव्य बीसीसीआयला रुचले नाही. कारण सामनाधिकाऱ्यांना आपले मत प्रसारमाध्यमांकडे व्यक्त करता येत नाही.
आयसीसी आता अडचणीच्या स्थितीत आहे. कारण दुसऱ्या कसोटी सामन्याच्या मैदानी पंचानी बुधवारपर्यंत अधिकृत तक्रार दाखल केलेली नव्हती. (वृत्तसंस्था)