बीसीसीआय संकटात : अनुराग ठाकूर
By admin | Published: December 24, 2016 01:17 AM2016-12-24T01:17:55+5:302016-12-24T01:17:55+5:30
‘बीसीसीआय’वरील लोढा पॅनलच्या शिफारशींचे संकट क्रिकेटपटूंना हितावह नसल्याची कबुली देत बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर
नवी दिल्ली : ‘बीसीसीआय’वरील लोढा पॅनलच्या शिफारशींचे संकट क्रिकेटपटूंना हितावह नसल्याची कबुली देत बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्यावाचून पर्याय नसल्याचे म्हटले आहे.
३ जानेवारीला कोर्टाचा निर्णय येणार आहे. ठाकूर हे प्रो-कुस्ती लीगसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात ते म्हणाले, ‘सद्य:स्थिती क्रिकेटपटूंना हितावह नाही, याची मला जाणीव आहे. बीसीसीआय संकटात असून,
३ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या माजी सरन्यायाधीश आर. एन. लोढा यांच्या पॅनलच्या शिफारशींचा उल्लेख करीत त्यांनी वरील वक्तव्य केले. बोर्डाने लोढा समितीच्या काही शिफारशी मान्य नसल्याची भूमिका घेतल्याने अंतिम निर्णयाकडे त्यांचे लक्ष लागले आहे. काही माजी पदाधिकाऱ्यांनी बोर्डावर टीका केल्याप्रकरणी लक्ष वेधताच ठाकूर म्हणाले, ‘बीसीसीआयने सरकारकडून एकही छदाम न घेता स्वत:ची पायाभूत सुविधा उभारली. तरीसुद्धा काहीजण आमच्यावर तोंडसुख घेतात.’
बीसीसीआय एक लाख पंचायतींपर्यंत एक लाख कोचेस का पाठवित नाही, या प्रश्नाच्या उत्तरात ठाकूर हसून म्हणाले, ‘आमच्याकडे खूप पैसा आहे; पण आम्ही तो खर्च करू शकत नाही. यासाठी परवानगीची गरज आहे.’ सर्वोच्च न्यायालयाने बोर्डावर निधी देण्यास निर्बंध घातले आहेत.
आयसीसी कार्यकारी ग्रुपमध्ये भारताचा समावेश न केल्याबद्दल ठाकूर यांनी ‘आयसीसी’चीदेखील खिल्ली उडविली. ते म्हणाले, ‘मी बैठकीत होतो. विश्व क्रिकेट बलाढ्य करायचे झाल्यास बीसीसीआयची गरज असल्याचे प्रत्येक सदस्याचे मत होते. बीसीसीआयविना हे काम होऊ शकेल, असे कुणाला वाटत असेल, तर बीसीसीआयविना विश्व क्रिकेट प्रगती करू शकत नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. (वृत्तसंस्था)