प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा बीसीसीआयचा निर्णय
By admin | Published: June 22, 2017 01:19 AM2017-06-22T01:19:14+5:302017-06-22T01:19:14+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी क्रिकेट सल्लागार समितीला (सीएसी) वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील.
अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे. कुंबळे यांच्या कार्यशैलीवर कर्णधार विराट कोहलीने आक्षेप नोंदविल्यानंतर त्यांनी विंडीज दौऱ्यापर्यंत आपला करार वाढविण्यास नकार दिला. या प्रक्रियेसोबत जुळलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, की अर्ज सादर करण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यात उच्च पात्रता व दर्जा असलेल्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येईल. बीसीसीआयने यापूर्वी पदासाठी अर्ज मागविले होते, त्या वेळी अखेरची तारीख ३१ मे होती.
वीरेंद्र सेहवागबाबत विचारले असता हा अधिकारी म्हणाला, ‘‘अधिक अर्ज मागविण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे सेहवागच्या अर्जासोबत काही देणेघेणे नाही. प्रशिक्षक कोण असेल, याचा निर्णय शेवटी सीएसीला घ्यायचा आहे. जेवढे अधिक पर्याय असतील, तेवढा योग्य उमेदवार निवडता येईल.’’ आतापर्यंत सेहवाग, मुडी, राजपूत, रिचर्ड पायबस आणि डोडा गणेश यांनी या पदासाठी अर्ज केला आहे. आॅस्ट्रेलियाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक क्रेग मॅकडरमॉट यांनीही अर्ज केला होता; पण वेळेवर न पोहोचल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. (वृत्तसंस्था)