‘बीसीसीआय’च्या मदतीची ‘कॅबी’ला गरज
By admin | Published: May 23, 2015 01:00 AM2015-05-23T01:00:58+5:302015-05-23T01:00:58+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा असणाऱ्या या संघाने एकदिवसीय व टी-२० असे दोन वर्ल्डकप जिंकले.... आशियाई क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले...
रोहित नाईक ल्ल मुंबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा असणाऱ्या या संघाने एकदिवसीय व टी-२० असे दोन वर्ल्डकप जिंकले.... आशियाई क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले... ज्या देशाने क्रिकेट जन्माला घातले त्या इंग्लंड विरुध्द एकदाही हार पत्करली नाही.... अशी दैदिप्यमान कामगिरी करणारा संघ दुसऱ्या तिसऱ्या देशाचा नसून खुद्द ‘भारत’ देशाचा आहे. फरक एकच की, हा अंध खेळाडूंचा संघ आहे आणि जागतिक पातळीवर वर्चस्व मिळाल्यानंतरही आज हा संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मान्यता मिळण्याच्या प्रतिक्षेत ताटकळत उभा आहे.
क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इन इंडिया (कॅबी) अंतर्गत भारतामध्ये अंध खेळाडू क्रिकेट खेळतात. शुक्रवारी भारताचा अंध खेळाडूंचा संघ इंग्लंड विरुध्द क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईहून इग्लंडला रवाना झाला. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ २४ -३० मे दरम्यान ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार असून यानंतर भारतीय चमू बहारीन येथे १ ते ४ जून दरम्यान मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी जाईल. विशेष म्हणजे पुढील वर्षीचा अंध खेळाडूंचा वर्ल्डकप भारतात होणार असून या स्पर्धेची पुर्वतयारी म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.
जगभरात क्रिकेट खेळणाऱ्या सर्व प्रमुख राष्ट्रांचा अंध खेळाडूंचा संघ आपआपल्या मुख्य राष्ट्रीय क्रिकेट संघटनेशी संलग्न असताना देखील जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘वजन’ असलेल्या बीसीसीआयने अजूनही ‘कॅबी’ला आधार दिलेला नाही. मात्र सध्या कार्यरत असलेल्या नवीन समितीकडून आम्हाला अनेक अपेक्षा असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ‘कॅबी’चे जनरल सेक्रेटरी व वर्ल्ड ब्लाईंड क्रिकेट काऊंसीलचे (डब्ल्यूबीसीसी) उपाध्यक्ष महंतेश जी.के. यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
२०१२ साली बंगळुरु येथे झालेल्या पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकताना भारताने अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवले होते. यानंतर गतवर्षी डिसेंबर महिन्यात द. आफ्रिकेत झालेला एकदिवसीय सामन्यांचा वर्ल्डकप पटकावताना पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानचा फडशा पाडला. मात्र तरीही ‘बीसीसीआय’ ची दृष्टी या संघावर अजूनही पडलेली नाही.