बीसीसीआयपुढे आयसीसीचे नमते
By admin | Published: September 8, 2016 04:30 AM2016-09-08T04:30:21+5:302016-09-08T04:30:21+5:30
जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डापुढे (बीसीसीआय) नमते घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) द्विस्तरीय कसोटीचा वादग्रस्त प्रस्ताव चर्चेआधीच मागे घेतला.
नवी दिल्ली : जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डापुढे (बीसीसीआय) नमते घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) द्विस्तरीय कसोटीचा वादग्रस्त प्रस्ताव चर्चेआधीच मागे घेतला.
बीसीसीआयने प्रस्तावास विरोध केल्यानंतर श्रीलंका, झिम्बाब्वे आणि बांगलादेश बोर्डाने सुरात सूर मिळविला होता. तब्बल चार बोर्डांचा कडवा विरोध परवडणारा नाही, हे लक्षात येताच सीईओंच्या दोन दिवसांच्या बैठकीपूर्वीच प्रस्ताव बुधवारी मागे घेण्यात आला. यावर नव्याने विचार करण्यात येईल, इतकेच प्रस्ताव मागे घेताना सांगण्यात आले.
बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर सुरुवातीपासून या प्रस्तावाच्या विरोधात होते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत बोर्डासाठी ही पद्धत मारक तसेच प्रतिगामी असल्याचे त्यांचे मत होते. ठाकूर यांनी आज आयसीसीच्या भूमिकेचे स्वागत केले. आयसीसी सदस्यांंनी गांभीर्य ओळखून प्रस्ताव मागे घेतला याचे मी स्वागत करतो. प्रमुख बोर्ड म्हणून सर्वांना सोबत घेऊन चालण्याची बीसीसीआयची भूमिका आहे. क्रिकेटचे हित वगळून कुठलीही तडजोड नाही. लोकप्रियता आणि विकास खुंटेल, अशा कुठल्याही गोष्टींना आम्ही पाठिंबा देणार नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी आयसीसीचे आभार मानले. राहुल जोहरी यांनी द्विस्तरीय कसोटी क्रिकेटमुळे कसे नुकसान होऊ शकते, हे आयसीसीला पटवून देण्यात मोलाची भूमिका वठविली आहे. आयसीसीला कुठल्याही पद्धतीचा पायाभूत बदल करायचा झाल्यास दोन तृतीयांश बहुमताची गरज भासते. दहापैकी सात मते त्यांना आपल्या बाजूने हवी होती; पण चार सदस्य देश विरोधात गेल्याने आयसीसीने नमते घेतले.
नेहमी सोबत असणारे इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया बोर्ड आयसीसीकडेच असले तरी विंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सुरात सूर मिळविण्याचे ठरविल्याने आयसीसीला हा प्रस्ताव पारित करणे कठीण होऊन बसले असते. विंडीज बोर्ड चार दिवसांची कसोटी आणि दिवस-रात्रीचा कसोटी सामन्याच्या बाजूने असले तरी कसोटी क्रिकेटमधील संघांची दोन गटात विभागणी करणे आपल्याला मान्य नसल्याचे विंडीज बोर्डाचे मत होते. (वृत्तसंस्था)