कोच कुंबळे यांना बीसीसीआय ‘निरोप’ देणार?
By admin | Published: May 26, 2017 03:35 AM2017-05-26T03:35:12+5:302017-05-26T03:35:12+5:30
केंद्रीय करार आणि वेतनवाढीबाबत आक्रमक भूमिका घेणारे टीम इंडियाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांना निरोप देण्याची बीसीसीआयने पूर्ण तायरी केल्याचे संकेत मिळाले आहेत.
नवी दिल्ली : केंद्रीय करार आणि वेतनवाढीबाबत आक्रमक भूमिका घेणारे टीम इंडियाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांना निरोप देण्याची बीसीसीआयने पूर्ण तायरी केल्याचे संकेत मिळाले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी संपताच संपणाऱ्या त्यांच्या कराराचे नूतनीकरण करायचे नाही, असा पवित्रा घेणाऱ्या बीसीसीआयने गुरुवारी नव्या मुख्य कोचपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली. ३१ मेपर्यंत अर्ज मागितले असून, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची सल्लागार समिती इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार नि:पक्ष तसेच पारदर्शक प्रक्रियेसाठी प्रशासकांच्या समितीचा एक प्रतिनिधी क्रिकेट सल्लागार समितीच्या कामावर नजर ठेवणे गरजेचे आहे. सध्याचे कोच कुंबळे यांना थेट मुलाखत देण्याची मुभा देण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या आजच्या घोषणेनुसार बोर्डाचे दिग्गज अधिकारी कुंबळे यांच्या कार्यशैलीवर खूष नाहीत, हे स्पष्ट झाले. कुंबळे यांनी खेळाडूंचा करार आणि वेतन यांत वाढ करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांची हीच भूमिका बोर्डाला आवडलेली नाही. दुसरीकडे कोच या नात्याने कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने १३ पैकी १० कसोटी सामने जिंकले. याशिवाय, विंडीजमध्ये कसोटी मालिकादेखील जिंकली होती.
बोर्डाच्या एका अधिकाऱ्यानुसार सध्याचे मुख्य कोच म्हणून कुंबळे शर्यतीत आहेत; पण त्यांचे स्थान निश्चित नाही. संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये पोहोचताच कोचपदासाठी अर्ज मागवून बोर्डाने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. चॅम्पियन्स ट्रॉफी संपेपर्यंत बीसीसीआयला प्रतीक्षा करता आली असती; पण अर्ज मागवून कुणीही स्वत:चे स्थान अबाधित समजू नये, हा संदेश बोर्डाने दिला.
कुंबळे यांच्या मागण्या समजण्यापलीकडच्या आहेत. ते खेळाडूंना पुढे करून स्वत:चे वेतन वाढवून घेऊ इच्छितात. बीसीसीआयने त्यांच्याजागी कोणा दुसऱ्याची नियुक्ती केल्यास नवे कोच अशी मागणी करणार नाहीत. कुंबळे यांनी कोहलीची मागणी स्वत: रेटली. त्यांच्या मते, कर्णधारपदाचा भार सांभाळण्यासाठी कोहलीला २५ टक्के अतिरिक्त रक्कम मिळायलाच हवी. मुख्य कोच म्हणून त्यांना निवड समितीतदेखील स्थान हवे आहे. कुंबळे यांची मागणी लोढा समितीच्या शिफारशींविरोधात
आहे. निवड समितीत तीनच सदस्य असतील, असे लोढा समितीने आधीच स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)