बीसीसीआयची एसजीएम स्थगित
By Admin | Published: July 12, 2017 12:37 AM2017-07-12T00:37:14+5:302017-07-12T00:37:14+5:30
बीसीसीआयने विशेष आमसभा (एसजीएम) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : बीसीसीआयने विशेष आमसभा (एसजीएम) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन व त्यांच्या गटाने नियमांचा हवाला देत एसजीएम आयोजनावर आक्षेप नोंदवला आहे.
सहा राज्य संघटनांच्या प्रतिनिधींनी बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना यांना पत्र लिहून सोमवारी बोलाविण्यात आलेली एसजीएम नियमानुसार नसल्याचे म्हटले आहे.
आक्षेप नोंदविणाऱ्या राज्य संघटनांमध्ये तमिळनाडू क्रिकेट संघटना, अपात्र अधिकारी निरंजन शाह यांची सौराष्ट्र क्रिकेट संघटना, कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांची हरियाणा क्रिकेट संघटना, टी. सी. मॅथ्यू यांची केरळ क्रिकेट संघटना, गोवा क्रिकेट संघटना आणि कर्नाटक राज्य संघटना आदींचा समावेश आहे.
काळजीवाहू अध्यक्ष खन्ना यांनी यापूर्वीच काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांना दिलेल्या पत्रामध्ये घटनेनुसार पाऊल उचलण्याची सूचना केली होती. या सर्व संघटनांच्या मते, बोर्डाच्या घटनेनुसार बीसीसीआयची विशेष आमसभा (एसजीएम) बोलविण्यासाठी किमान १० दिवसांपूर्वी सूचना देणे आवश्यक असते. बहुसंख्य संघटना तोडगा काढण्यासाठी एसजीएम बोलाविण्यास व बीसीसीआयच्या विशेष समितीतर्फे करण्यात आलेल्या शिफारशीनुसार लोढा समितीच्या तीन शिफारशींचा अपवाद वगळता उर्वरित शिफारशी लागू करण्याच्या बाजूने आहेत.
श्रीनिवासन विरोधी गटाच्या मते, दिवंगत जगमोहन दालमिया यांनी डिसेंबर २००२ मध्ये केवळ दोन दिवसांच्या नोटीसवर एसजीएम बोलाविली होती. पण यात सहभागी झालेले बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणाले, ‘दालमिया यांनी बैठक बोलाविली होती, पण त्यासाठी सर्व सदस्यांची सहमती होती. पण येथे अनेक संघटनांनी आक्षेप नोंदविला आहे. बैठक आयोजित करण्यात आली तर या सर्व संघटना न्यायालयाचे दार ठोठावतील आणि घेतलेल्या निर्णयावर स्टे मिळवू शकतील.’
पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार एसजीएम सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता होणार होती. (वृत्तसंस्था)