ऐतिहासिक ५००व्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयचे अझरूद्दीनला निमंत्रण
By Admin | Published: September 17, 2016 05:27 AM2016-09-17T05:27:31+5:302016-09-17T05:27:31+5:30
भारताचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीनला कानपूर येथे होणाऱ्या ऐतिहासिक ५००व्या कसोटी सामन्यासाठी निमंत्रित केले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ : भारताचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीनला कानपूर येथे होणाऱ्या ऐतिहासिक ५००व्या कसोटी सामन्यासाठी निमंत्रित केले आहे. या आमंत्रणाचा अझरूद्दीनने स्वीकार केला. या संदर्भात बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, की अझरूद्दीन माजी कर्णधार आहे. त्याच्याव्यतिरीक्त माजी कर्णधारांपैकी के. श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर यांनीसुद्धा निमंत्रण स्वीकारले आहे आणि ते कानपूर कसोटीच्या वेळी उपस्थित राहणार आहेत.
कानपूरमध्ये २२ सप्टेंबरला न्यूझीलंडविरोधातील पहिला कसोटी सामना हा भारतीय संघाचा ५०० वा कसोटी सामना असणार आहे. या सामन्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही खास तयारी केली आहे. भारताच्या सर्व माजी कर्णधारांना बीसीसीआयने आमंत्रण दिले आहे. टॉससाठी देखील चांदीचं नाणं तयार केलं जात असून त्यावर ५०० वी कसोटी असं लिहिलेलं असणार आहे.
हा दिवस खास बनवण्यासाठी बीसीसीआयने अनेक कार्यक्रम आयोजीत केले आहेत अशी माहिती बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि उत्तरप्रदेश क्रिकेट संघाचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. या सामन्यावेळी सर्व माजी कर्णधारांचा सन्मान कऱण्यत येणार आहे. नारी कांट्रेक्टर, चंदू बोर्डे, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, रवि शास्त्री, सुनील गावसकर, सौरव गांगुली, सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सहवाग, के श्रीकांत, अनिल कुंबळे, राहुल द्रविड हे सर्व माजी क्रिकेटपटू यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.