पुण्याचा अंतिम फेरीत ‘सुंदर’ प्रवेश

By admin | Published: May 17, 2017 04:16 AM2017-05-17T04:16:31+5:302017-05-17T04:16:31+5:30

पुन्हा एकदा मोक्याच्यावेळी फलंदाजांनी कच खाल्ल्याने मुंबई इंडियन्सला यंदाच्या सत्रात तिसऱ्यांदा रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुध्द पराभव पत्करावा लागला.

'Beautiful' entry in Pune final | पुण्याचा अंतिम फेरीत ‘सुंदर’ प्रवेश

पुण्याचा अंतिम फेरीत ‘सुंदर’ प्रवेश

Next

- रोहित नाईक । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पुन्हा एकदा मोक्याच्यावेळी फलंदाजांनी कच खाल्ल्याने मुंबई इंडियन्सला यंदाच्या सत्रात तिसऱ्यांदा रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुध्द पराभव पत्करावा लागला.
गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पुणेकरांना ४ बाद १६२ धावांवर रोखल्यानंतर फलंदाजांच्या अपयशामुळे मुंबईला ९ बाद १४२ धावाच काढता आला. १६ धावांत तीन गडी बाद करणारा वॉशिंग्टन सुंदर सामनावीर ठरला.
२० धावांनी मिळविलेल्या या शानदार विजयाच्या जोरावर पुणेकरांनी पहिल्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईकडे अंतिम फेरीसाठी आणखी एक संधी असून एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याविरुध्द खेळून ते अंतिम फेरीसाठी प्रयत्न करतील.
पुण्याने दिलेल्या १६३ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा डाव मर्यादित राहिला. सलामीवीर पार्थिव पटेलचा अपवाद वगळता मुंबईचा एकही स्टार फलंदाज चमकला नाही. पार्थिवने एकाकी झुंज देताना ४० चेंडूत ३ चौकार व ३ षटकार ठोकताना ५२ धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याला इतर कोणत्याही फलंदाजाकडून आवश्यक साथ मिळाली नाही. लेंडल सिमन्स (५), कर्णधार रोहित शर्मा (१), अंबाती रायडू (०), केरॉन पोलार्ड (७), हार्दिक पांड्या (१४) आणि कृणाल पांड्या (१५) अशी मजबूत फलंदाजी स्वस्तात बाद झाली. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने १६ धावांत ३ महत्त्वाचे फलंदाज बाद करुन मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्याने सहाव्या षटकात रोहित आणि रायडू यांना बाद करुन मुंबईच्या फलंदाजीतली हवाच काढली. यानंतर पुणेकरांनी ठराविक अंतराने मुंबईला धक्के दिले. तसेच, मुळचा मुंबईकर असलेल्या शार्दुल ठाकूरने १५व्या षटकात कृणाल पांड्या आणि स्थिरावलेल्या पार्थिवला बाद करुन सामना पुर्णपणे पुण्याच्या बाजूने झुकवला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या पुण्याची सुरुवात खराब झाली. निर्धारीत २० षटकात ४ बाद १६२ धावांवर रोखून मुंबईकर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या व दुसऱ्या षटकात अनुक्रमे राहुल त्रिपाठी आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ बाद झाल्याने त्यांची २ बाद ९ धावा अशी अवस्था झालेली. यावेळी, मुंबईकरांनी आणखी तिखट मारा करताना पुणेकरांची आक्रमकता रोखली. परंतु, अजिंक्य रहाणे - मनोज तिवारी यांनी ८० धावांची मोलाची भागीदारी करुन पुण्याला सावरले. या दोघांनी शानदार अर्धशतक झळकावले. रहाणेने ४३ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ५६ धावा केल्या. तसेच, मनोजने ४८ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. रहाणे बाद झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने अखेरच्या काही षटकात केलेल्या जोरदार हल्ल्याच्या जोरावर पुण्याने दिडशेचा टप्पा ओलांडला. धोनीने २६ चेंडूत ५ षटकरांसह दिलेला नाबाद ४० धावांचा तडाखा सामन्यात निर्णायक ठरला.

धोनी चाहत्याची मैदानात धाव...
पुण्याने मुंबईविरुध्द विजय मिळवल्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एका चाहत्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा झेंडा घेऊन मैदानात धाव घेतली. यावेळी त्याला पकडण्यासाठी सुरक्षारक्षकांनीही धाव घेतली. त्या चाहत्याने खेळपट्टीजवळ धोनीच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत सुरक्षारक्षकांनी त्याला पकडल्याने त्याचे प्रयत्न फसले. यावेळी त्या चाहत्याला सुरक्षारक्षकांनी पकडून मैदानाबाहेर नेले.

संक्षिप्त धावफलक
रायजिंग पुणे सुपरजायंट्स: २० षटकांत ४ बाद १६२ धावा.(अजिंक्य रहाणे ५६,मनोज तिवारी ५८, महेंद्रसिंग धोनीनाबाद ४०, मॅक्लेनघन, मलिंगा, कर्ण शर्मा प्रत्येकी एक बळी.)
मुंबई इंडियन्स:२० षटकांत ९ बाद १४२ धावा.(पार्थिव पटेल ५२,कुणाल पांड्या १५, हार्दिक पांड्या १४,मॅक्लेनघन १२, बुमराह नाबाद १६, वॉशिंग्टन सुंदर ३/१६, शार्दुल ठाकूर ३/३७, जयदेव उनाडकट, फर्ग्यूसन प्रत्येकी एक बळी.)

Web Title: 'Beautiful' entry in Pune final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.