दोन बॉसमुळेच पाक क्रिकेटचा खेळखंडोबा
By admin | Published: April 10, 2016 03:30 AM2016-04-10T03:30:44+5:302016-04-10T03:30:44+5:30
नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२0 वर्ल्डकप आणि आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या सुमार कामगिरीनंतर प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणाऱ्या वकार युनूसने पाकिस्तान क्रिकेट
कराची : नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२0 वर्ल्डकप आणि आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या सुमार कामगिरीनंतर प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणाऱ्या वकार युनूसने पाकिस्तान क्रिकेट मंडळात दोन बॉस असल्यामुळेच देशातील क्रिकेटचा खेळखंडोबा झाल्याचे म्हटले आहे.
वकारने सांगितले, ‘परिवारात दोन प्रमुख असणे सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे कोणतीही मदत मिळत नाही. पीसीबीत अध्यक्ष शहरयार खान आणि कार्यकारी समितीचे अध्यक्ष नजम सेठी यांच्या रूपाने दोन बॉस आहेत जे की, क्रिकेटला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जात आहेत. यात फक्त प्रशिक्षकच नाही, तर पूर्ण देशाच्या क्रिकेटवर परिणाम होत आहे. ही बाब महत्त्वपूर्ण आहे, त्यावर लक्ष आवश्यक आहे.’
तो म्हणाला, ‘प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांच्या कालखंडात विशेष काही करू शकलो नाही. पाकिस्तानी क्रिकेटला प्रोत्साहन देणे हा उद्देश असल्याचे पीसीबीने समजायला हवे. बोर्डातील लोकांनी आपली जबाबदारी समजून संघ आणि कोचिंग स्टाफच्या जवळ जायला हवे, असे मी याआधीही म्हटले आहे. त्यांना खेळ आणि क्रिकेटचे महत्त्व नाही. क्रिकेट संघ त्यांच्यासाठी नाही. त्यांनी आपली जबाबदारी ओळखायला हवी.’
आशिया कप आणि वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघ आठपैकी फक्त तीन लढतीच जिंकू शकला होता. संघाच्या सुमार कामगिरीनंतर वकारने त्याच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याचा करार संपण्यास तीन महिने बाकी होते. वकारप्रमाणेच कर्णधार शाहीद आफ्रिदीनेही राजीनामा दिला होता.
वकारने प्रशिक्षकपदी कायम राहण्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर म्हटले की, ‘पाकिस्तान क्रिकेटची कार्यशैली बदलू, अशी मला आशा वाटत होती; परंतु मी जे करू इच्छित होतो ते करू शकलो नाही. संघात जास्तीत जास्त युवा खेळाडू यावेत यासाठी मी नेहमीच प्रयत्न केला होता; परंतु दुर्दैवाने हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. काही ताकद मला असे करण्यापासून रोखत होती. काहीजण मला विचारत आहेत की, जेव्हा इतक्या समस्या होत्या तेव्हा आपले पद लवकर का सोडले नाही. तथापि, सिस्टीम सुधारण्यासाठी आपले सिस्टीममध्ये राहणे आवश्यक आहे, यावर माझा विश्वास आहे. मी समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला; परंतु ते होऊ शकले नाही.
कर्णधार म्हणून आफ्रिदीत ज्या उणिवा आहेत त्या सर्वांसमोर आहेत. त्याच्या वर्तनाची समस्या आहे. तो जास्त वेळ बसून अनेक बाबींवर चर्चा करू शकत नाही आणि चर्चा समजून कार्यान्वित करू शकत नाही. मी पीसीबीला दिलेल्या अहवालात या सर्व बाबींचा उल्लेख केला होता. रिपोर्ट लीक झाल्यामुळे आमच्या दोघांत कटुता आली. कसोटी कर्णधार मिस्बाह उल हकसोबत माझे चांगले संबंध होते आणि हे सर्वच जाणतात. माझ्या दृष्टीने जेव्हा तुम्ही कर्णधार असता तेव्हा तुम्ही तुमच्या प्रशिक्षकांकडून काही शिकू शकता. वकारने संघात एक हाय परफॉर्मन्स पद असण्याच्या आवश्यकतेवरही भर दिला.