विश्वचषक फुटबॉलमध्ये स्वयंसेवक बना
By admin | Published: March 4, 2017 12:14 AM2017-03-04T00:14:24+5:302017-03-04T00:14:24+5:30
भारतात फुटबॉलसारख्या जागतिक खेळाची विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदाच होत असल्याने या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
रोहित नाईक,
मुंबई- क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉलसारख्या जागतिक खेळाची विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदाच होत असल्याने या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आॅक्टोबर महिन्यात भारतातील सहा शहरांमध्ये रंगणाऱ्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रत्यक्षपणे थरार अनुभवण्यासाठी अनेकांची आतापासूनच धडपड सुरू आहे. परंतु, जर या स्पर्धेत प्रेक्षक म्हणून नाही, तर स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली तर? हो, हे शक्य आहे. फुटबॉलच्या या कुंभमेळ्यामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) जगभरातील उत्साही क्रीडाप्रेमींना उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी फिफाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक व्यक्ती आपली उपलब्धी कळवू शकतात, तसेच अधिक माहितीही मिळवू शकतात, अशी माहिती स्थानिक आयोजक समितीने (एलओसी) ‘लोकमत’ला दिली.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी फिफाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आॅनलाइन अर्ज भरणे आवश्यक असून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, इंग्रजीव्यतिरिक्त इतर विदेशी भाषा अवगत असलेल्या उमेदवारांना अधिक संधी असेल अशी माहितीही समितीकडून मिळाली.
एकूण अर्जांपैकी समितीच्यावतीने पात्र उमेदवारांची निवड होईल आणि त्यांना स्पर्धेआधी सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येईल. या उपक्रमामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या कलागुणांनुसार कामाचे स्वरुप देण्यात येईल. प्रसारमाध्यम समन्वयक (मिडिया कोआॅर्डिनेटर), विविध संघांसोबत समन्वय साधणे, परदेशी प्रेक्षकांना सहाय्य करणे, स्टेडियममध्ये सुरक्षेव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये आयोजकांना मदत करणे अशा प्रकारच्या अनेक कार्यांचा या उपक्रमामध्ये समावेश आहे. दरम्यान, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना ‘फिफा’च्यावतीने प्रमाणपत्र मिळणार असून याचा त्यांना भविष्यात खूप मोठा फायदा होईल.
६ मार्चला या उपक्रमाची घोषणा होईल. त्यानंतर आॅनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होईल.
या स्पर्धेत प्रत्येकाला खेळाडू म्हणून सहभागी होता येणार नाही. परंतु, स्वयंसेवक म्हणून स्पर्धेत योगदान देण्याची संधी.
ई-वॉलिंटीअर म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून काम करु शकता. यानुसार सोशल मिडियावर स्पर्धेविषयी माहिती देऊन जनजागृती करु शकता. यासाठीचे विशेष आॅनलाइन प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
भारतात पहिल्यांदाच फिफा विश्वचषक होत आहे, मग तो ज्यूनिअर असो की सिनिअर; याने काही फरक पडत नाही. भारतात याआधी कधीही ‘फिफा’ची जागतिक स्पर्धा आयोजित झालेली नाही. त्यामुळे अशा स्पर्धेचा भाग होणे, खूप मोठी संधी आहे. ती वाया घालवू नका, कारण अशी संधी नेहमी मिळत नाही. जितके व्यक्ती स्पर्धेशी जोडले जातात ती स्पर्धा अधिक लोकांपर्यंत पोहोचते.
- जॉय भट्टाचार्य, उपक्रम संचालक
(एलओसी, फिफा अंडर-१७ विश्वचषक)