मुलाखतीला सुरुवात, सेहवाग बीसीसीआयच्या कार्यालयात दाखल
By admin | Published: July 10, 2017 01:47 PM2017-07-10T13:47:47+5:302017-07-10T13:47:47+5:30
भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग मुलाखतीसाठी बीसीसीआयच्या कार्यालयात दाखल झाला आहे. त्यामुळे पहिली मुलाखत सेहवागचीच होणार आहे. तीन सदस्यांची क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) प्रशिक्षकपदासाठीच्या मुलाखती घेणार आहे.
सीएसी समितीमदील सचिन भारतात नसल्यामुळे तो स्काईप वरुन आपला सहभाग नोंदवणार आहे. सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण कार्यलयात दाखल झालेले आहेत.
या पदासाठी १० व्यक्तींनी बीसीसीआयकडे अर्ज सादर केले आहेत. त्यात शास्त्री यांच्याव्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, रिचर्ड पायबस, डोडा गणेश, लालचंद राजपूत, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा (ओमान राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक), फिल सिमन्स आणि उपेंद्रनाथ ब्रह्मचारी (इंजिनियर, क्रिकेटची कुठलीही पार्श्वभूमी नाही) यांचा समावेश आहे. सीएसी या १०पैकी ६ उमेदवारांची मुलाखत घेणार असल्याचे वृत्त आहे.
सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाखतीसाठी संभाव्य उमेदवारांमध्ये शास्त्री, सेहवाग, मुडी, सिमन्स, पायबस व राजपूत यांचा समावेश असू शकतो. सध्या क्लूसनर यांना स्टॅन्डबाय ठेवले जाऊ शकते, पण त्यांची या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता धुसर आहे. विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक व माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांनी विंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त आहे. कुंबळे-कोहली वादानंतर सीएसीला आपल्या पसंतीबाबत सावधगिरी बाळगावी लागेल; कारण नव्या प्रशिक्षकाला दोन वर्षांसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे.
शास्त्रीने सुरुवातीला या पदासाठी अर्ज केला नव्हता. पण बीसीसीआयने अर्ज स्वीकारण्याची मुदत ९ जुलैपर्यंत वाढविली त्या वेळी माजी कर्णधार शास्त्रीने अर्ज केला. आता शास्त्री या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कोहलीसोबतच्या चांगल्या संबंधांमुळे शास्त्री या पदासाठी सर्वांत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. शास्त्री यांच्या संचालकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाने ५० षटकांच्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. शास्त्री यांच्याबाबत सौरव गांगुली यांचे मत काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शास्त्री व सौरव यांनी यापूर्वी एकमेकांवर टीका केली होती.