खेळाडूंच्या बेशिस्तीमुळे महाराष्ट्राची पीछेहाट
By admin | Published: July 18, 2014 02:32 AM2014-07-18T02:32:35+5:302014-07-18T02:32:35+5:30
सध्या कबड्डीत होत असलेल्या महाराष्ट्राच्या पीछेहाटीला खेळाडूंचा बेशिस्तपणा कारणीभूत असून, अशा खेळाडूंवर व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर आचारसंहिता लावली जाईल
मुंबई : सध्या कबड्डीत होत असलेल्या महाराष्ट्राच्या पीछेहाटीला खेळाडूंचा बेशिस्तपणा कारणीभूत असून, अशा खेळाडूंवर व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर आचारसंहिता लावली जाईल, असे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी ‘कबड्डी दिना’निमित्त परखडपणे सुनावले.
कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त नुकताच तुळजापूर येथे कबड्डी दिन सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात पाटील बोलत होते.
सध्या कबड्डीचे सामने मॅटवर घेणे अनिवार्य झाल्याने किशोर व कुमार गटातील खेळाडूंना जास्तीतजास्त मॅटवर सराव दिला पाहिजे. जेणेकरून मॅटवर आपण कोठे कमी पडतो हे कळेल व भविष्यात खुल्या गटासाठी महाराष्ट्राला अधिक खेळाडू लाभतील, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.
‘सर्कल कबड्डी’ हा कबड्डीचा नवीन प्रकार जाणून घेऊन त्यात यश मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे किनारपट्टी ठिकाणी मोठ्या प्रमाणात खेळल्या जाणाऱ्या बीच कबड्डी प्रकारातदेखील महाराष्ट्राने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे सांगताना पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला कबड्डीतील गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे मतदेखील मांडले.
दरम्यान, या वेळी दिवंगत बाबाजी जामसांडेकर, दिवंगत मुकुंद जाधव व कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या स्मरणार्थ कुमार व किशोर गटातील प्रत्येकी आठ अशा एकूण १६
खेळाडूंना ५ हजार रुपयांची
शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच सांगलीच्या काशिलींग आडके याला मधू पाटील स्मृती पुरस्कार तर मुंबई उपनगरच्या अभिलाषा म्हात्रे हिला अरुणा साटम स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिवाय यंदाच्या मोसमात राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद गुण मिळवणाऱ्या मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर ‘लोकमत’ (परभणी)चे जेष्ठ क्रीडा पत्रकार
माधव शेजूळ यांचादेखील महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. (क्रीडा प्रतिनिधी)