विम्बल्डन चॅम्पियन होणे ही विलक्षण अनुभूती
By admin | Published: July 13, 2015 12:42 AM2015-07-13T00:42:28+5:302015-07-13T00:42:28+5:30
टेनिसमधील सर्वांत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या विम्बल्डन महिला दुहेरीचे जेतेपद मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी करणे, ही माझ्या दृष्टीने विलक्षण अनुभूती असल्याची
नवी दिल्ली : टेनिसमधील सर्वांत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या विम्बल्डन महिला दुहेरीचे जेतेपद मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी करणे, ही माझ्या दृष्टीने विलक्षण अनुभूती असल्याची प्रतिक्रिया स्टार चॅम्पियन सानिया मिर्झा हिने व्यक्त केली.
जेतेपद मिळविल्यानंतर सानियाने लंडन येथे दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘कालचा अंतिम सामना आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ सामना होता. कारण येथे चारही खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली. सर्वांनी शानदार टेनिसचा नमुना सादर केला. आम्ही जेतेपद सर केले, याचा आनंद वाटतो. विम्बल्डन चॅम्पियन होणे, हीच माझ्यादृष्टीने विलक्षण अनुभूती आहे.
पुन्हा एकदा ‘नंबर वन’
विम्बल्डन महिला दुहेरीतील विजेती जोडी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांना सोमवार पासून सुरु होणाऱ्या जागतिक मानांकन स्पर्धेच्या ‘रोड टू सिंगापूर - डबल रेस’ स्पर्धेत पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहचेल. सिंगापूरमध्ये होणाऱ्या डब्ल्यूटीए फायनल्समध्ये विम्बल्डन सुरु होण्याआधी सानिया - हिंगीस जोडी द्वितीय क्रमांकावर होती.
अमेरीकेची बेथानी माटेक आणि झेक प्रजासत्ताकची लूसी सफारोवा या जोडीने पहिले स्थान पटकावले होते. परंतु, आता विम्बल्डन विजेतेपद पटकावल्यानंतर मार्टिना - हिंगीस जोडी सिंगापूर रेसमध्ये पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर विराजमान होईल. वर्षाच्या शेवटी होणाऱ्या डब्ल्यूटीए फायनल्समध्ये जगातील अव्वल आठ जोडी सहभागी होतात.
क्रिकेट लीजेंड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे विम्बल्डन प्रेम जगजाहीर आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यासाठी देखील त्याने हजेरी लावली होती. पहिल्यांदा विम्बल्डन विजेतेपद पटकावलेल्या सानियाचे अभिनंदन करताना सचिनने ट्वीट केले की, ‘या शानदार विजेतेपदासाठी सानिया - हिंगीस यांचे सर्वप्रथम खुप अभिनंदन. भविष्यात देखील तुम्ही अशीच विजेतेपद जिंकाल अशी आशा करतो.
पंतप्रधान म्हणाले, ‘‘मार्टिना आणि सानिया, आपण छान खेळ केला. शानदार खेळ करीत विम्बल्डन जिंकल्याबद्दल आम्ही गौरवान्वित झाल्याचा आनंद आहे.’’