क्षमतेवर विश्वास ठेवणार
By admin | Published: December 23, 2015 01:17 AM2015-12-23T01:17:27+5:302015-12-23T01:17:27+5:30
गेल्या १५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यानंतर आता काही सिद्ध करण्याची गरज नाही.
नवी दिल्ली : गेल्या १५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यानंतर आता काही सिद्ध करण्याची गरज नाही. आगामी स्पर्धांसाठी मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवणार आहे, असे मत भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजनसिंगने व्यक्त केले. हरभजनची आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या टी-२० संघात निवड झाली आहे. मार्च महिन्यात भारतात होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेपूर्वी ही मालिका होणार आहे.
टी-२० विश्वकप स्पर्धा लवकरच होणार आहे. त्यासाठी काही नवे अस्त्र शोधले का, याबाबत बोलताना हरभजन म्हणाला, ‘मला प्रयोग करण्याची गरज नाही. कॅरम बॉल किंवा दुसऱ्या कुठल्याप्रकाराचा चेंडू टाकण्यासाठी मेहनत घेण्याची गरज नाही. आॅफ ब्रेक आणि ‘दुसरा’ हे माझे महत्त्वाचे अस्त्र आहेत. गेल्या १५ वर्षांत यामुळे मला बरेच यश मिळवता आले.’ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रभावी कामगिरी केल्यानंतरही भारताच्या वन-डे संघात स्थान न मिळाल्यामुळे हरभजन निराश झाला असेल, पण त्याने याबाबत भाष्य करण्याचे टाळले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने चार सामन्यांत सहा बळी घेतले. त्याची प्रतिषटक सरासरी ५.५० होती.
हरभजन म्हणाला,‘दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेत माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली. आता माझे लक्ष भारताला टी-२० विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकावून देण्यावर केंद्रित झाले आहे. माझ्या नावावर दोन विश्वविजेतेपद आहे. २००७
(टी-२०) आणि २०११ (वन-डे विश्वकप) या दोन्ही स्पर्धांमध्ये हरभजनने संघाचे प्रतिनिधित्व केले होते. जर माझी विश्वविजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्यासाठी भारताला मदत करू शकलो, तर माझ्यासाठी विशेष ठरेल.’ (वृत्तसंस्था)
आशिष नेहरा भारतासाठी
मॅच विनर ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत २००३ मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वकप स्पर्धेदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली होती. नेहराने देशाला किती सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला, हे स्कोअरबुकवरून बघता येईल. पाकिस्तानविरुद्ध मोहालीमध्ये उपांत्य फेरीत डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र चार वर्षे त्याची भारतीय संघात निवड झाली नाही.
- हरभजनसिंग