कोलकात्यानंतर गुजरातनेही केला बंगळुरुचा दारुण पराभव

By admin | Published: April 27, 2017 11:41 PM2017-04-27T23:41:37+5:302017-04-28T02:16:28+5:30

अँड्र्यू टाय आणि स्फोटक फलंदाज अ‍ॅरोन फिंच या आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या लाजवाब कामगिरीच्या बळावर गुजरात लायन्सने

Bengaluru defeats Bengaluru after Kolkata | कोलकात्यानंतर गुजरातनेही केला बंगळुरुचा दारुण पराभव

कोलकात्यानंतर गुजरातनेही केला बंगळुरुचा दारुण पराभव

Next

ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 27 - अँड्र्यू टाय आणि स्फोटक फलंदाज अ‍ॅरोन फिंच या आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या लाजवाब कामगिरीच्या बळावर गुजरात लायन्सने आज येथे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. या पराभवाबरोबरच विराट कोहली अँड कंपनीचे आयपीएल प्लेआॅफमध्ये पोहोचण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.

कोलकाता येथे चार दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये सर्वांत कमी ४९ धावांत गारद होणारा आरसीबीचा संघ आजच्याही लढतीत प्रारंभीच ढेपाळला आणि त्यातून ते अखेरपर्यंत सावरू शकले नाही. त्यांच्या फक्त चार फलंदाजांना दुहेरी आकडी धावा फटकावता आल्या. त्यात पवन नेगीने १९ चेंडूंत ३२, केदार जाधवने १८ चेंडूंत ३१ धावा केल्या. अखेर त्यांचा संघ २० षटकांत १३४ धावांत गारद झाला.
त्यानंतर फिंचने अवघ्या ३४ चेंडूंतच ५ चौकार आणि ६ षटकारांसह ७२ धावांचा पाऊस पाडताना आरसीबीच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या. कर्णधार सुरेश रैना ३० चेंडूत ३४ धावांवर नाबाद राहिला. अशा प्रकारे लायन्सने अवघ्या १३.५ षटकांत ३ बाद १३५ धावा करीत ३७ चेंडू बाकी ठेवताना दणकेबाज विजयाची नोंद केली. आरसीबीचा हा ९ सामन्यांतील सहावा पराभव आहे आणि त्यांचे फक्त ५ गुण आहेत. लायन्सने आठव्या सामन्यात तिसरा विजय मिळवला आणि आता ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.
विजयाचा पाठलाग करताना गुजरातचीही सुरुवात खराब झाली आणि त्यांचे दोन्ही सलामीवीर इशान किशन (१६) आणि आयपीएलमध्ये १०० वा सामना खेळणारा ब्रँडन मॅक्युलम (३) यांना सॅम्युअल बद्रीने बाद केले. त्यानंतर फिंचने तडाखेबंद फलंदाजी करताना आरसीबीला डोके वर काढण्याची संधीच मिळू दिली नाही. फिंचने बद्रीला दोन षटकार मारत त्याचे विश्लेषण बिघडवले. त्यानंतर त्याने श्रीनाथ अरविंदला दोन चौकार व नंतर यजुवेंद्र चहलचे षटकाराने स्वागत केले. या आॅस्ट्रेलियन फलंदाजाने अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीवर २ चौकार व एका षटकारासह २२ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. गुजरात लायन्सकडून हे सर्वांत वेगवान अर्धशतक ठरले. बाद होण्यापूर्वी फिंचने ११ व्या षटकात नेगीला दोन षटकार ठोकले. फिंच परतल्यानंतर रैनाने नेगीला षटकार आणि ट्रेव्हिसला दोन चौकार ठोकत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या फलंदाजांची ढिसाळ कामगिरी पुन्हा एकदा एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कायम राहिली. त्यामुळे गुजरातने गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर बँगलोरला २० षटकांत अवघ्या १३४ धावांत गारद केले.
आॅस्ट्रेलियन गोलंदाज अँड्र्यू टाय पुन्हा एकदा प्रभावी ठरला. त्याने ४ षटकांत फक्त १२ धावा देत ३ गडी बाद केले. रवींद्र जडेजाने २८ धावांत २, तर जेम्स फॉकनर, बासील थम्पी आणि अंकित सोनी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर त्यांना प्रारंभीच जोरदार धक्के सहन करावे लागले. कर्णधार विराट कोहली (१०), स्फोटक ख्रिस गेल (८), संघात पुनरागमन करणारा ट्रेव्हिस हेड (०) हे धावफलकावर अवघ्या २२ धावा असताना तंबूत परतले.
संक्षिप्त धावफलक 
आरसीबी : २० षटकांत १३४. (पवन नेगी ३२, केदार जाधव ३१, विराट कोहली १०. अँड्र्यू टाय ३/१२, रवींद्र जडेजा २/२८)
गुजरात लायन्स : १३.५ षटकांत ३ बाद १३५. (अ‍ॅरोन फिंच नाबाद ७२, रैना नाबाद ३४, इशान किशन १६. सॅम्युअल बद्री २/२९, पवन नेगी १/२४).

Web Title: Bengaluru defeats Bengaluru after Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.