बर्म्युड्यात मैदातानच क्रिकेटपटूंची फ्रि स्टाईल हाणामारी
By admin | Published: September 22, 2015 06:33 PM2015-09-22T18:33:32+5:302015-09-22T18:33:32+5:30
क्रिकेट हा जंटलमन्स गेम म्हणून ओळखला जात असला तरी र्म्युडातील क्रिकेट सामन्यात चक्क दोन क्रिकेटपटूंमध्ये फ्रि स्टाईल हाणामारी झाल्याने क्रिकेटच्या प्रतिमेलाच हादरा बसला आहे.
ऑनलाइन लोकमत
हॅमिल्टन (बर्म्युडा), दि. २२ - क्रिकेट हा जंटलमन्स गेम म्हणून ओळखला जात असला तरी आता या खेळाची प्रतिमा बदलत असल्याचे दिसते. शाब्दिक बाचाबाची, वाद हे प्रकार आता क्रिकेटमध्ये नवीन नसले तरी बर्म्युडातील क्रिकेट सामन्यात चक्क दोन क्रिकेटपटूंमध्ये फ्रि स्टाईल हाणामारी झाली. दुर्दैवी बाब म्हणजे यातील एक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर बर्म्युडाकडून खेळला आहे.
बर्म्युडात क्लीवलँड काऊंटी क्रिकेट क्लब व विलो कट्स क्रिकेट क्लब या स्थानिक संघांमध्ये नुकताच एक सामना पार पडला. या सामन्यात बर्म्युडाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि क्लीवलँडचा यष्टीरक्षक जेसन अँडरसन आणि प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज ओ ब्रायन यांच्यात वाद झाला होता. ओव्हर संपल्यावर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांवर आक्षेपार्ह टीका केली व ओ ब्रायनने अँडरसनच्या दिशेने बॅट दाखवली. यानंतर अँडरसनचा पारा चढला व त्याने रागाच्या भरात थेट ओ ब्रायनला धक्काबुक्की केली. भर मैदानातच दोघांमध्ये फ्रि स्टाईल हाणामारी सुरु झाल्यावर पंचांनी धाव घेत दोघांमधील भांडण सोडवले. या प्रकाराची बर्म्युडा क्रिकेट बोर्डाने गंभीर दखल घेतल अँडरसनवर आजीवन बंदी घातली आहे. तर ओ ब्रायनलाही सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.