आगामी सत्रात उत्कृष्ट कामगिरीचे लक्ष्य : इरफान
By admin | Published: January 14, 2015 02:26 AM2015-01-14T02:26:39+5:302015-01-14T02:26:39+5:30
आगामी रणजी सत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे; त्यात मी नक्कीच यशस्वी होईल, असे मत सध्या टीम इंडियातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने व्यक्त केले आहे़
नवी दिल्ली : आगामी रणजी सत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे; त्यात मी नक्कीच यशस्वी होईल, असे मत सध्या टीम इंडियातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने व्यक्त केले आहे़
नोव्हेंबर २०१२ ते जानेवारी २०१५ पर्यंत इरफानला केवळ तीनच प्रथम श्रेणी सामने खेळता आले़ कारण दुखापतीमुळे तो संघातून जास्त वेळ बाहेरच होता़
इरफान पुढे म्हणाला, की पुन्हा एकदा आता कमबॅक करीत आहे, याचा आनंद आहे़ आता आगामी सत्रात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्याची इच्छा आहे़ त्यासाठी गोलंदाज आणि फलंदाजीवर विशेष मेहनत घेतली आहे़ यादरम्यान मी आपल्या फिटनेसवरही मेहनत घेतली आहे़ याच बळावर आगामी सत्रात चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे़
२०१४ च्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) खेळताना इरफानच्या खांद्याला दुखापत झाली होती़ त्यामुळे त्याला केवळ १० सामनेच खेळता आले होते़ यानंतर चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेदरम्यान पुन्हा त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यानंतर जवळपास ६ महिने तो क्रिकेटपासून दूर राहिला होता़
दरम्यान, इरफान पठाणने बडोदा संघाला सोडचिठ्ठी देत असल्याचा इन्कार केला आहे़ तो म्हणाला, बडोदा क्रिकेट संघटनेने (बीसीए) मला फिटनेस सिद्ध करण्यास सांगितले होते़ क्लबच्या दोन-तीन सामन्यांत मी खेळून फिटनेस सिद्ध करू शकतो़ संघटनेतील काही अधिकारी माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत़ ड्रेसिंग रूममधील काही गोष्ट जाणीवपूर्वक सार्वजनिक केल्या जात आहेत़ मी संघ सोडण्याची कधीही भाषा केली नाही, असेही तो म्हणाला़
(वृत्तसंस्था)