प्रत्येक सामन्यात सर्वश्रेष्ठ कामगिरीची गरज : आॅल्टमेस
By Admin | Published: July 25, 2016 01:46 AM2016-07-25T01:46:25+5:302016-07-25T01:46:25+5:30
रिओ आॅलिम्पिकच्या पोडियमवर उभे राहायचे असेल, तर आम्हाला प्रत्येक सामन्यात सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल,’ असे मत भारताच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलेंट आॅल्टमेस यांनी व्यक्त केले.
बंगळुरू : ‘रिओ आॅलिम्पिकच्या पोडियमवर उभे राहायचे असेल, तर आम्हाला प्रत्येक सामन्यात सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल,’ असे मत भारताच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलेंट आॅल्टमेस यांनी व्यक्त केले.
आॅलिम्पिकसाठी संघ रवाना होण्यापूर्वी आॅल्टमेस म्हणाले, ‘‘भारतीय हॉकी संघ कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे. आॅलिम्पिकपूर्वी आमच्या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही संघाविरुद्ध चांगला खेळ करू शकतो. आॅलिम्पिकमध्ये आम्हाला ही कामगिरी पुन्हा करू शकतो, हे दाखवावे लागेल. आम्हाला आमची सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे. जर आम्ही हे करू शकलो, तर आम्ही पदक जिंकू शकतो.’’
भारतीय संघ दहा दिवसांच्या राष्ट्रीय शिबिरानंतर आज माद्रिदला रवाना झाला. येथे भारत दोन प्रेक्षणीय सामने खेळून स्पेनसाठी रवाना होणार आहे. सरदार सिंगच्या ऐवजी कर्णधारपदी निवडलेल्या श्रीजेशनेही या वेळी संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘आम्हाला भारतीयांकडून मिळणारे प्रोत्साहन पाहून खूपच आनंद होत आहे. यातूनच आम्हाला चांगला खेळ करण्याची प्रेरणा मिळेल. आमच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण असेल.
आम्ही प्रत्येक संघाविरुद्ध रणनीती तयार केली असून, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. आम्ही मैदानावर आमच्या रणनीतीसह उतरणार आहोत.’’ (वृत्तसंस्था)