अश्विनपासून सावधान
By admin | Published: September 12, 2016 12:47 AM2016-09-12T00:47:34+5:302016-09-12T00:47:34+5:30
न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत आर. अश्विनपासून सावध राहण्यास सांगितले आहे
आॅकलंड : न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत आर. अश्विनपासून सावध राहण्यास सांगितले आहे. खेळपट्टीचे स्वरूप बघितल्यानंतर संघात तीन फिरकीपटूंना संधी देण्याबाबत विचार करीत असल्याचे हेसन यांनी यावेळी सांगितले.
हेसन संघातील फिरकीपटू मार्क क्रेग, ईश सोढी व मिशेल सेंटनर यांच्या कामगिरीमुळे प्रभावित झाले आहे. या तिन्ही फिरकीपटूंनी एकूण ३४ कसोटी सामने खेळले आहेत.
हेसन म्हणाले, ‘जर शक्य झाले तर वेगवान गोलंदाज सुरुवातीला दोन-तीन षटके टाकतील. संघात तीन फिरकीपटू असतील तर दुसऱ्या टोकाकडून फिरकीपटू गोलंदाजीची सुरुवात करेल. अश्विनविरुद्ध खेळताना आघाडीच्या फळीत दोन डावखुरे फलंदाज असतील आमच्यासाठी ते मोठे आव्हान ठरणार आहे. परिस्थितीनुसार संघाची निवड करावी लागेल.’
भारताविरुद्धच्या खडतर दौऱ्यापूर्वी ४१ वर्षीय हेसन यांनी युवा गोलंदाजांची प्रशंसा केली असून, भारताविरुद्धच्या मालिकेत त्यांच्याकडून चमकदार कामगिरीची आशा असल्याचे म्हटले आहे.
हेसन म्हणाले, ‘संघात युवा गोलंदाजांचा समावेश आहे. ईश व मिशेल यांना कसोटी क्रिकेटच्या तुलनेत पांढऱ्या चेंडूने खेळणारे क्रिकेट सोपे वाटले. त्यांची कामगिरी चांगली असून त्यांना संधी मिळायला हवी. गेल्या मोसमात मार्क क्रेगचे पुनरागमन प्रभावित करणारे ठरले. त्याचे तंत्र सुधारले असून चेंडूचा टप्पा अचूक राखण्यावर भर देत आहे.’
न्यूझीलंड संघ १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई विरुद्ध दिल्ली येथे तीनदिवसीय सराव सामना खेळणार आहे, तर पहिला कसोटी सामना २२ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळला जाणार आहे. हेसन पुढे म्हणाले, ‘यष्टिरक्षक फलंदाज ल्युक रोंची अंतिम संघात स्थान मिळवण्याचा दावेदार ठरू शकतो. कारण फिरकी मारा खेळण्यास सक्षम असलेल्या सलामीवीराची संघात निवड करायची आहे.’
न्यूझीलंडतर्फे मार्टिन गुप्तील व टॉम लॅथम नियमितपणे डावाची सुरुवात करतात.
न्यूझीलंड संघाचे आगमन उद्या होणार
नवी दिल्ली : न्यूझीलंड क्रिकेट संघ कसोटी मालिकेसाठी उद्या मंगळवारी भारतात दाखल होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘न्यूझीलंड संघ मंगळवारी भारतात दाखल होणार असून, त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन व प्रशिक्षक माईक हॅसन पत्रकार परिषदेला संबोधित करतील.’
भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान पहिली कसोटी २२ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्कवर खेळली जाणार आहे. दुसरा कसोटी सामना ३० सप्टेंबरपासून कोलकाता येथील ईडन गार्डनवर तर तिसरा कसोटी सामना ८ आॅक्टोबरपासून इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. कसोटी मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान पाच वन-डे सामन्यांची मालिका होणार अहे. न्यूझीलंड संघ कसोटी मालिकेपूर्वी दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये मुंबईविरुद्ध १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. (वृत्तसंस्था)