महाराष्ट्राचे जय कवळी बीएफआयचे महासचिव
By Admin | Published: September 26, 2016 12:16 AM2016-09-26T00:16:11+5:302016-09-26T00:16:11+5:30
भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत अजयसिंह यांची अध्यक्ष आणि महासचिव म्हणून महाराष्ट्राचे जय कवळी यांची बहुमताने निवड झाल्यानंतर
मुंबई : भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत अजयसिंह यांची अध्यक्ष आणि महासचिव म्हणून महाराष्ट्राचे जय कवळी यांची बहुमताने निवड झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या बॉक्सिंग संघातील वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजयसिंह यांना ४९ मते मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी रोहित जैन यांना अवघी १५ मते मिळाली. मतदान आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघ (एआयबीए) आणि क्रीडामंत्रालयाच्या निरीक्षकांच्या निरीक्षणाखाली झाले. एआयबीएचे प्रतिनिधित्व त्यांचे ओसनिया विभागाचे उपाध्यक्ष एडगर तानेर यांनी केले, तर क्रीडामंत्रालयाने भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या सुश्मिता ज्योत्सी यांना आपला निरीक्षक म्हणून पाठवले होते. उत्तराखंडचे प्रतिनिधित्व करणारे ५१ वर्षीय अजयसिंह हे प्रसिद्ध उद्योगपती असून, ते उत्तराखंड मुष्टियुद्ध महासंघाचे उपाध्यक्षदेखील आहेत. अजयसिंह हे अखेरच्या क्षणी अध्यक्षपदाच्या शर्यतीत दाखल झाले आणि सूत्रांनुसार त्यांना भारतीय आॅलिम्पिक संघटनेचा पाठिंबादेखील होता. महाराष्ट्राचे जय कवळी यांची महासचिव म्हणून निवड झाली. त्यांना ४८ मते मिळाली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी लेनी डिगामा यांना अवघी १२ मते मिळाली. सचिवपदाच्या शर्यतीतील तिसरे उमेदवार हरियाणाचे राकेश ठाकरान यांना अवघी चारच मते मिळाली. आसामचे हेमंत कुमार कलिता यांची कोषाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. गेल्या आठवड्यात नामांकन प्रक्रिया संपली. त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी दाखल केली नव्हती.
एआयबीएचे निरीक्षक तानेर यांनी निवड प्रक्रियेवर समाधान व्यक्त केले.
भारतीय मुष्टियुद्ध महासंघाची कार्यकारिणी : अध्यक्ष : अजयसिंह, महासचिव : जय कवळी, कोषाध्यक्ष : हेमंत कुमार कलिता, उपाध्यक्ष : गोइबी सलामसिंह, जान खारशिंग, अनिल कुमार बोहिदार, सी.बी. राजे, अमरजितसिंह, नरेंद्र कुमार निर्वाण, राजेश भंडारी, अनिल कुमार मिश्रा, विभागीय सचिव : स्वप्न बॅनर्जी, जी.व्ही. रवी, आर. गोपू, राजेश देसाई, दिग्विजयसिंग, संतोष कुमार दत्ता, राजीवकुमार सिंह.