भाग्यश्री भंडारीचे विजेतेपद
By Admin | Published: July 26, 2016 01:25 AM2016-07-26T01:25:22+5:302016-07-26T01:25:22+5:30
अनुभवी भाग्यश्री भंडारीने अपेक्षित कामगिरी करताना स्पर्धेत चमकदार आगेकूच करणाऱ्या सिध्दि कांगणेला २-० असे रोखून मुंबई जिल्हा पिकलबॉल स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले.
मुंबई : अनुभवी भाग्यश्री भंडारीने अपेक्षित कामगिरी करताना स्पर्धेत चमकदार आगेकूच करणाऱ्या सिध्दि कांगणेला २-० असे रोखून मुंबई जिल्हा पिकलबॉल स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. त्याचवेळी अतुल एडवर्ड आणि नताशा बेग बलाढ्य जोडीने मिश्र दुहेरी, तर सचिन मांद्रेकर - सुनिल जोशी यांनी पुरुष दुहेरीच्या विजेतेपदावर कब्जा केला.
आॅल इंडिया पिकलबॉल असोसिएशनच्या (आयपा) मान्यतेने मुंबई उपनगर जिल्हा पिकलबॉल संघटनेच्या वतीने खार जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेत चुरशीचे सामने झाले. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतात पिकलबॉलचे सामने वातानुकुलित बंदिस्त स्टेडियममध्ये खेळविण्यात आले. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पहिला सेट सहज जिंकल्यानंतर भाग्यश्रीला सिध्दिकडून कडवी झुंज मिळाली. मात्र मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना भाग्यश्रीने ११-९, १२-१० अशी बाजी मारत जेतेपद पटकावले. तर, काव्या प्रभूने कांस्य पदकावर नाव कोरले.
मिश्र दुहेरी अंतिम सामना भारताकडून पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळवलेल्या अतुल एडवर्डने आपल्या अनुभवाच्या जोरावर गाजवला. त्याने आपली नवखी जोडीदार नताशा बेगसह सुरुवातीपासून शांतपणे खेळ करताना कृष्णा केसरकर - कादंबरी पाटील या युवा जोडीला नमवले. अतुल - नताशा यांनी पहिला सेट एकतर्फी जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कृष्णा - कादंबरी यांनी चांगली टक्कर दिली. मात्र दडपणाखाली झालेल्या चुकांचा फटका बसल्याने त्यांना पराभूत व्हावे लागले. अतुल - नताशा यांनी ११-२, ११-५ अशा विजयासह विजेतेपदाला गवसणी घातली. कुणाल बारे - अंकिता बालेकर यांनी कांस्य पटकावले
त्याचवेळी, पुरुष दुहेरी गटात सचिन - सुनिल यांनी अनपेक्षित विजेतेपद पटकावताना आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या मनिष राव आणि भूषण पोतणीस यांना नमवले. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पहिला सेट मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर सचिन - सुनिल यांना मनिष - भुषण यांनी चांगलेच झुंजवले. मात्र मिळवलेली पकड अखेरपर्यंत टिकवताना सचिन - सुनिल यांनी ११-४, ११-१३ अशा विजयासह जेतेपद पटकावले. तसेच, रुषभ मेहता - जमशेद बनाजी यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)