भज्जीचे दोन वर्षांनी पुनरागमन

By admin | Published: May 21, 2015 12:18 AM2015-05-21T00:18:58+5:302015-05-21T00:18:58+5:30

गलादेश दौऱ्याच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात अनुभवी हरभजन सिंगची निवड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

Bhajji returns after two years | भज्जीचे दोन वर्षांनी पुनरागमन

भज्जीचे दोन वर्षांनी पुनरागमन

Next

बांगलादेश दौरा : एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात निवड
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून युवा खेळाडूंवर विश्वास दाखवणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीने आगामी होणाऱ्या बांगलादेश दौऱ्याच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात अनुभवी हरभजन सिंगची निवड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या अनपेक्षित निवडीने भज्जी दोन वर्षांहून अधिक काळानंतर पुन्हा एकदा भारताची जर्सी घालून मैदानात उतरेल. बुधवारी राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी १५ खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय कसोटी संघाची घोषणा केली.
सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गोलंदाजीसहीतच आक्रमक फलंदाजी करून तो संघासाठी निर्णायक कामगिरी करीत आहे. तरी त्याची निवड आयपीएलच्या कामगिरीवरून न झाल्याचे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याविषयी अधिक माहिती देताना पाटील म्हणाले, की यापूर्वीदेखील हरभजनच्या नावाची चर्चा झाली होती. हरभजनची निवड ही बांगलादेशच्या फलंदाजांची फळी पाहून करण्यात आली आहे. त्यांच्याकडे डावखुरे फलंदाज अधिक असून, हरभजन आपल्या अनुभवाच्या जोरावर चांगली कामगिरी करू शकेल. याविषयी आम्ही कर्णधार विराट कोहली सोबतदेखील चर्चा केली.
हरभजनचा अपवाद वगळता संघामध्ये फारसा बदल दिसत नाही. मात्र, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला कसोटी संघातून डच्चू दिला आहे. तर, गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून सावरत असलेल्या मोहम्मद शमीच्या जागी मुंबईकर धवल कुलकर्णीला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे.
याआधी बांगलादेश दौऱ्याकरिता अव्वल खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंवर जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानची झालेली वाताहत पाहता बीसीसीआय कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे या संघनिवडीवरून दिसत आहे.
एकीकडे भज्जीची निवड होत असताना दुसरीकडे वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि युवराज सिंग या वरिष्ठ खेळाडूंचा विचारही झाला नाही. कर्णधार व निवड समितीने कामगिरी व तंदुरुस्तीनुसार खेळाडूंची निवड केली. युवराजविषयी चर्चा नाही झाली. कोणावर चर्चा झाली किंवा नाही हे सांगणे कठीण आहे, असे संदीप शर्मा म्हणाले.
(क्रीडा प्रतिनिधी)

कोणीही खेळापेक्षा मोठा नाही :
अनुराग ठाकूर
मुंबई : आयपीएल सामन्यादरम्यान प्रेयसी अनुष्का शर्मासोबत संवाद साधल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीच्या वर्तनाकडे
खास महत्त्व न देता बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी कोणीही खेळाडू खेळापेक्षा
मोठा नसून, या प्रकरणी आचारसंहिता उल्लंघनाबाबतची चौकशी सुरू आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात पावसामुळे खेळ थांबण्यात आल्यानंतर विराट कोहली व्हीआयपी बॉक्समध्ये बसलेल्या अनुष्कासोबत गप्पा मारताना दिसला. नियमानुसार कोणत्याही खेळाडूला डगआऊटमध्ये उपस्थित संघ सहकारीव्यतिरिक्त अन्य कोणाशीही बोलण्यास परवानगी नसताना कोहलीने या नियमाचा भंग केला. दरम्यान, कोहलीविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन ठाकूर यांनी दिले.
आयपीएल भ्रष्टाचार विरोधक नियमांनुसार या प्रकरणाची चौकशी होणार असून, कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नाही. खेळाच्या नियमानुसार चौकशी करण्यात येईल, असेही ठाकूर यांनी सांगितले.

भज्जीने २०१३ साली हैदराबाद येथे आॅस्टे्रलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये भज्जी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भज्जीने एकूण १०१ कसोटी सामने खेळताना ४१३ बळी घेतले आहेत.

ही माझ्यासाठी नवी सुरुवात आहे. माझ्या या नवीन इनिंगची सुरुवात मला आत्मविश्वासाने करायची असून, या संधीचे सोने करण्यासाठी मी सज्ज आहे. माझ्या गोलंदाजी शैलीत मी काही बदल केले असून, कमजोर बाजूवर अधिक मेहनत घेतली आहे. चाहत्यांच्या शुभेच्छांमुळे हे शक्य झाले असून, संघात पुनरागमन करणे खूप महत्त्वाचे होते. या दिवसासाठी मी गेल्या दोन वर्षांपासून मेहनत घेत होतो. मी कधीही भारतीय संघातील पुनरागमनासाठी आशा सोडली नव्हती.
- हरभजन सिंग

Web Title: Bhajji returns after two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.