भक्ती कुलकर्णीने रोवला मानाचा तुरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 09:09 PM2018-11-26T21:09:21+5:302018-11-26T21:11:25+5:30

जयपूर येथील स्पर्धेत राष्ट्रीय चॅम्पियन

Bhakti Kulkarni won national women chess championship | भक्ती कुलकर्णीने रोवला मानाचा तुरा!

भक्ती कुलकर्णीने रोवला मानाचा तुरा!

googlenewsNext
ठळक मुद्दे महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णी हिने जयपूर येथे झालेली राष्ट्रीय महिला बुद्धिबळ चॅम्पियनशीप जिंकलीआशियाई स्पर्धेत करणार भारताचे  प्रतिनिधीत्वआशियाई आणि विश्व महिला चॅम्पियशीप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.

पणजी : गोव्याची पहिली महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णी हिने जयपूर येथे झालेली राष्ट्रीय महिला बुद्धिबळ चॅम्पियनशीप जिंकली. याबरोबरच तिने पुढील आशियाई आणि विश्व महिला चॅम्पियशीप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी साधली. यापूर्वी सुद्धा राष्ट्रीय चॅम्पियनशीप जिंकण्याचा मान तिने पटकाविला होता. त्यामुळे आपल्या शानदार यशाच्या बळावर भक्तीने शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. उल्लेखनीय म्हणजे, ज्युनियर गटात तिने राष्ट्रीय स्पर्धेचा चषक बºयाचदा पटकाविला आहे. आता वरिष्ठ गटातही तिने गोव्यासाठी चषक पटकाविला आहे. आता ज्युनियर आणि वरिष्ठ गटात राष्ट्रीय, आशियाई आणि राष्ट्रकूल चॅम्पियशीपमध्ये विजेतेपद पटकाविणारी ती पहिली महिला गोमंतकीय खेळाडू ठरली आहे. 
स्पर्धेत पेट्रोलियम बोर्डाच्या मेरी गोम्सकडून नवव्या फेरीत पराभूत झाल्यानंतर भक्ती पुनरागमन करेल, असे वाटत नव्हते. मात्र, प्रयत्नांची पराकाष्टा करीत तिने मुसंडी मारली आणि स्पर्धेच्या चषकावर नाव कोरले. दहाव्या फेरीत भक्तीने मिशेल कॅथरिनाचा पराभव तर अंतिम फेरीत तामिळनाडूच्या सरन्या जे हिला बरोबरीवर रोखले.मेरी गोम्स आणि भक्ती या दोघी प्रत्येकी ८.५ गुणांवर राहिल्या. 
चषक पटकाविल्यानंतर भक्तीने आपल्या यशाचे श्रेय तिचे प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले आणि पालकांना दिले. भक्तीच्या यशाचे कौतुक अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे महासचिव भारत सिंह चौहान यांनी केले. गोव्यातील एक आघाडीची बुद्धिबळपटू म्हणून भक्तीचा उल्लेख करणे गरजेचे आहे. ती ज्या पद्धतीने योगदान देत आहे, निश्चितच तिचे भविष्य उज्ज्वल आहे, असे चौहान म्हणाले. भक्तीने गोवा कार्बन लिमिटेडचे श्रीनिवास धेंपो, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नीलेश काब्राल आणि सचिव किशोर बांदेकर यांचेही आभार व्यक्त केले. किशोर बांदेकर यांनी भक्तीचे कौतुक करताना म्हटले की, तिने दुसºयांदा राष्ट्रीय महिला स्पर्धा जिंकली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिने गोव्याचे नाव उज्ज्वल केले आहे. भविष्यात तिच्याकडून अशीच अपेक्षा आहे. गोव्याच्या बुद्धिबळ क्षेत्रासाठी तिचे यश अभिमानास्पद आहे. 
दरम्यान, पुढील महिन्यात युनायटेड अरब अमिरात चेस फेडरेशनने आयोजित केलेल्या शारजाह चषक महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी भक्तीला आमंत्रित करण्यात आले आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण
आशियाई महिला चॅम्पियनशीप (२००६, उजबेकिस्तान)
राष्ट्रकूल महिला स्पर्धा (२०१४, स्कॉटलँड)
विश्व शालेय मुलींची स्पर्धा (२००८, सिंगापूर)
आशियाई ज्युनियर मुलींची स्पर्धा (२०११, श्रीलंका)
राष्ट्रकूल ज्युनियर मुलींची स्पर्धा (२०१२, चेन्नई)
१८ वर्षांखालील आशियाई स्पर्धा (२०१०, चीन)
१४ वर्षांखालील मुलींची आशियाई स्पर्धा (२००६, इराण)
१६ वर्षांखालील राष्ट्रकूल (२००६, मुंबई)

राष्ट्रीय स्तरावर कामगिरी
दोन वेळा राष्ट्रीय ज्युनियर मुलींच्या स्पर्धेचा चषक (२००७,२००९)
दोन वेळा राष्ट्रीय महिला चॅलेंजर स्पर्धा (२०११, २०१७)
दोन वेळा राष्ट्रीय प्रीमियर उपविजेतेपद (२०१२, २०१७)
राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा (२०१८-१९)

Web Title: Bhakti Kulkarni won national women chess championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.