भालाफेकपटू नीरज चोप्रा ध्वजवाहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 03:13 AM2018-08-11T03:13:34+5:302018-08-11T03:14:24+5:30
गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील यशानंतर भारतीय खेळाडू १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांग येथे होणाऱ्या आशियाईमध्ये पदके जिंकण्यास उत्सुक आहेत.
नवी दिल्ली : गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील यशानंतर भारतीय खेळाडू १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांग येथे होणाऱ्या आशियाईमध्ये पदके जिंकण्यास उत्सुक आहेत. स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा हा उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक म्हणून दिसणार आहे. भारतीय आॅलम्पिक संघाचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
नीरज चोप्राने २०१६ मध्ये आयएएफ २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. २० वर्षांचा नीरज राष्टÑकुल चॅम्पियन असून गेल्या महिन्यात फिनलॅन्डमधील सावो येथे त्याने सुवर्ण पदक जिंकले. २०१७ च्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेतही त्याने ८५.२३ मीटर भालाफेक करीत सुवर्ण पटकविले होते. याआधी झालेल्या २०१४ च्या आशियाईमध्ये माजी हॉकी कर्णधार सरदारसिंग ध्वजवाहक होता. कोरियातील इंचियोनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने ११ सुवर्ण, १० रौप्य आणि ३६ कांस्य पदकासह एकूण ५७ पदकांची कमाई केली होती. त्याआधी, दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीयांनी एकूण १०१ पदकांची कमाई केली होतीम तर २००२ मध्ये मँचेस्टर येथील स्पर्धेमध्ये ६९ पदके मिळवली होती. (वृत्तसंस्था)
>आशियाई स्पर्धेचा ध्वजवाहक म्हणून निवड झाल्याने मी फार रोमांचित आहे. या मोठ्या स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करणे सन्मानाची बाब आहे. मला ही बाब अचानक समजल्यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे. माझी भालाफेक स्पर्धा २७ आॅगस्टला असली तरी ध्वजवाहक बनल्यामुळे १७ आॅगस्ट रोजी इंडोनेशीयामध्ये दाखल होणार आहे.
- नीरज चोप्रा, भालाफेकपटू.