भुवनेश्वरने डोळे दिपवले
By admin | Published: July 21, 2014 01:56 AM2014-07-21T01:56:49+5:302014-07-21T01:56:49+5:30
दुसऱ्या कसोटीचा आणि मालिकेचा निकाल काहीही लागो; पण एका खेळाडूने सर्वांची मने जिंकली आहेत, तो म्हणजे भुवनेश्वर कुमार.
अजय नायडू, लंडन
दुसऱ्या कसोटीचा आणि मालिकेचा निकाल काहीही लागो; पण एका खेळाडूने सर्वांची मने जिंकली आहेत, तो म्हणजे भुवनेश्वर कुमार. बॅट आणि बॉल या दोन्ही ठिकाणी त्याने सरस कामगिरी केली आहे. २४ वर्षीय भुवनेश्वरने चार ेडावांत तीन अर्धशतके केली आहेत. केवळ अर्धशतके म्हणून या धावा महत्त्वाच्या नाहीत, तर अतिशय दबावाच्या परिस्थितीत डावाचा नूर पालटणाऱ्या भागीदाऱ्या करताना त्याने ही अर्धशतके केली आहेत, म्हणून त्यांना अतिशय महत्त्व आहे.
आज, रविवारी त्याने रवींद्र जडेजाबरोबर ९९ धावांची भागीदारी करून भारताला या सामन्यात ड्रायव्हिंग सीटवर नेऊन बसविले. भारताने कसोटी जिंकली तर त्याचे अर्धेअधिक श्रेय भुवनेश्वरकुमारला निर्विवादपणे द्यावे लागेल.
भुवीने त्याच्या चार डावात ५८, ६३*, ३६ आणि ५२ अशा धावा केल्या आहेत. यात त्याने चारही वेळा महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या केल्या आहेत. नॉटिंगहॅम कसोटीत पहिल्या डावात त्याने मोहम्मद शमीबरोबर १११ धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावात तो स्टुअर्ट बिन्नीबरोबर उभा राहिला आणि कसोटी अनिर्णित केली. लॉर्डस कसोटीच्या पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेने शतकाचा कळस चढविला. त्याचा पाया भुवनेश्वरकुमार बनला होता. या चार डावांत त्याने एक शतकी आणि तीन नव्वदीच्या भागीदाऱ्या केल्या. म्हणून तर त्याची बॅटिंग बघून वासीम आक्रमला तो भारताचा अष्टपैलू खेळाडू असल्याचे वाटते.
स्विंग आणि सिम हे त्याचे अस्त्र आहे. त्याचसाठी त्याला संघात घेण्यात आले आहे. त्या भूमिकेला त्याने न्यायही दिला आहे. लॉर्डसवर त्याने डावात सहा बळी घेतले. त्याचा आयडॉल असलेला प्रवीणकुमार आणि त्याचा रणजी सहकारी आर. पी सिंग यांच्या यादीत आपले नाव बघून भुवनेश्वर कुमारला अभिमान वाटतो आहे. फलंदाजीत यश मिळाल्याने गोलंदाजीसाठी आत्मविश्वास वाढला असे तो सांगतो. प्रवीणकुमारने दिलेल्या टिप्स अतिशय उपयुक्त ठरल्याचेही त्याने सांगितले.